पतीच्या त्रासाला कंटाळून पत्नीने बाथरूममध्ये घेतले विष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2021 04:15 AM2021-04-21T04:15:51+5:302021-04-21T04:15:51+5:30
फोटो लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : पतीपासून होणाऱ्या त्रासाला कंटाळून कविता योगेश नेटके (वय ३०) या विवाहितेने बाथरूममध्ये विषप्राशन ...
फोटो
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : पतीपासून होणाऱ्या त्रासाला कंटाळून कविता योगेश नेटके (वय ३०) या विवाहितेने बाथरूममध्ये विषप्राशन केल्याची घटना मंगळवारी सकाळी ९ वाजता वानखेडे सोसायटीत घडली. दरम्यान, दुपारी १२ वाजता कविताचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मुलीच्या मृत्यूसाठी पती कारणीभूत असल्याचा आरोप करीत माहेरच्या मंडळींनी संताप व्यक्त केला.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कविता नेटके ही विवाहिता पती योगेश, मुलगा सिद्धेश (१२), मोहित (८), सासरे वसंत अर्जुन नेटके व सासू उषाबाई नेटके यांच्यासह वानखेडे सोसायटीत वास्तव्याला होती. पती योगेशचा ट्रॅव्हल्सचा व्यवसाय आहे. माहेरच्या लोकांनी दिलेल्या माहितीनुसार योगेश कविताच्या चारित्र्यावर संशय घेत होता, त्यामुळे तिने संतापात विषप्राशन करून आत्महत्या केली या घटनेला पतीच जबाबदार असून, त्याच्याविरुद्ध कारवाई करावी म्हणून कविताचे वडील मधुकर वानखेडे, भाऊ विजय व संदीप यांनी संताप व्यक्त केला. दरम्यान, जिल्हा पेठ पोलीस ठाण्याचे निरीक्षक विलास शेंडे, सहायक निरीक्षक मनोज वाघमारे, उपनिरीक्षक मगन मराठे, महेंद्र बागुल, तुषार जवरे, प्रवीण भोसले यांनी खासगी रुग्णालयात धाव घेतली. दोन्हीकडील लोकांची समजूत घालून मृतदेह जिल्हा रुग्णालयात नेला. शवविच्छेदन झाल्यानंतर मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला.
पतीला घेतले ताब्यात
परिस्थितीचे गांभीर्य व संभाव्य धोका लक्षात घेता पोलिसांनी कविताचा पती योगेश नेटके याला ताब्यात घेतले होते. त्यानंतर घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. मुलांकडून काही माहिती घेण्यात आली.