वाकडी गावामध्ये असुरक्षीततेची भावना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2019 04:16 PM2019-03-29T16:16:06+5:302019-03-29T16:16:19+5:30
मुलांची नग्न धिंड काढण्याच्या घटनेनंतर पुन्हा भीतीचे वातावरण
जामनेर : वाकडी, ता.जामनेर येथे आठ महिन्यांपूर्वी विहिरीत मागासवर्गीय मुलांनी आंघोळ केल्यानंतर त्यांची गावात नग्न धिंड काढून अमानुष मारहाण केल्याची अमानवीय घटना घडल्याने राज्यात खळबळ उडाली होती. अशातच याच गावातील ग्रामपंचायत सदस्य असलेल्या मातंग समाजातील विनोद चांदणे या तरुणाचा निर्घूण खून झाल्याने समाज बांधवांमध्ये असुरक्षीतचेची भावना निर्माण झाली आहे. त्यामुळे गावातील दहशतीकडे कोणी लक्ष देईल का ? असा सवाल उपस्थित केला जात आहे.
वाकडी ग्रामपंचायतीच्या कारभाराकडे लक्ष ठेऊन असणाऱ्या विनोद चांदणे यांनी गैरव्ययहार उघडकीस आणले व चौकशीची मागणी केल्याने याचा राग ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांच्या मनात होता, असे सांगण्यात येत आहे. याच रागातून चांदणे यांच्यावर सहा महिन्यात दोन वेळा जिवघेणे हल्ले करण्यात आले. दोन वर्षापूर्वीदेखील माजी सरपंचाने धमकी दिल्याची माहिती मिळाली. याबाबत चांदणे यांनी वेळोवेळी पोलीस प्रशासनाकडे धाव घेतली, मात्र राजकीय दबावामुळे त्याकडे दुर्लक्ष झाल्यानेच अखेर एकाकी लढणाºया चांदणे याला जीव गमवावा लागल्याचे नातेवाईतांचे म्हणणे आहे.
घटनेतील संशयीत राजकीय पक्षाचे कार्यकर्ते असल्याने त्यांना सत्ताधाऱ्यांचे पाठबळ असल्याचा चांदणे कुटुंबीयांचा आरोप आहे. संशयीत मुख्य सूत्रधार असलेल्या चंद्रशेखर वाणी याची गावात दहशत असल्याचा आरोप मयत चांदणे याचा भाऊ राजू याने केलेला आरोप गंभीर असून त्याची पोेलिसांनी दखल घेणे गरजेचे आहे.
गरीबीत जीवन जगत असलेले वाकडीतील मातंग समाज बांधव मोलमजुरी करतात. आम्हाला सुखाने जगू द्या हीच त्यांची अपेक्षा आहे. पण सत्ताधाºयांच्या जीवावर त्यांना जगणे कठीण केले असल्याचे आरोप होत आहे. गावातील मागासवर्गीय असुरक्षीत असून त्यांच्यात सुरक्षीतचेची भावना निर्माण होण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे असल्याचा मुद्दा आता पुढे आला आहे.
निवडणुकांमुळे नेत्यांचे दुर्लक्ष
तालुक्यात एव्हढी गंभीर घटना घडूनदेखील सत्ताधारी अथवा विरोधकांनी याकडे दुर्लक्ष केल्याने मागासवर्गीयांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली आहे. सध्या लोकसभा निवडणुकीची धामधूम असल्याने राजकीय नेत्यांचे दुर्लक्ष होत आहे, मात्र मते मागायला याल तेव्हा जाब विचारु अशी संतप्त भावना वाकडीचे ग्रामस्थ व्यक्त करीत आहेत.