रेल्वेस्थानकावर ‘जल’गावची अनुभूती!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2023 03:00 PM2023-04-02T15:00:11+5:302023-04-02T15:00:49+5:30
५४ वर्षांपासून पुरवताय तृप्तीचा घोट : श्री.सिद्धी व्यंकटेश देवस्थानतर्फे सेवा
कुंदन पाटील, जळगाव : गेल्या ५४ वर्षांपासून येथील रेल्वेस्थानकावर प्रवाशांना तृप्तीचा घोट पुरविणारी सेवा श्री.सिद्धी व्यंकटेश देवस्थानने यंदाच्या उन्हाळ्यातही कायम ठेवली आहे. त्यामुळे थंडगार पाण्याच्या माध्यमातून येथील रेल्वे स्थानकावर ‘जल’गावकरांचे दातृत्व हजारो प्रवाशाना दिलासादायी ठरत आहे. उद्योगपती सीतारामशेठ मणियार यांनी फोडलेला दातृत्वाचा पाझर पुढे चालून श्री.सिद्धी व्यंकटेश देवस्थानच्या माध्यमातून कायम राहिला. त्यामुळे दरवर्षी उन्हाळ्यात हा उपक्रम राबविला जातो. त्यासाठी ‘श्री’भक्त महिला व पुरुषांकरवी प्रवाशांना मोफत थंडगार पाण्याची सुविधा उपलब्ध करुन दिली जाते.
रेल्वेने प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांना पाणी पुरविण्यासाठी दिवसभर यंत्रणा सेवेत असते. विशेष म्हणजे पाणी पुरविण्यासाठी कुठलाही मोबदला न घेता ‘श्री’भक्त सेवारुपाने सेवा पुरवितात. त्यात महिलांचाही समावेश असतो. रेल्वे प्रशासनाच्यावतीने या सेवेसाठी जागा उपलब्ध करुन देण्याचे सौजन्य नित्यनियमाने दाखविले जाते.त्यामुळे गेल्या ५४ वर्षांपासून सुरु असलेली सेवा यंदाही कायम आहे. म्हणून देशभरातल्या प्रवाशांच्या मनात ‘जल’गाव ठसतच चालले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"