महिला अभियंत्यास मारहाण प्रकरणातील पती-पत्नीस अटक
By admin | Published: February 20, 2017 01:34 AM2017-02-20T01:34:31+5:302017-02-20T01:34:31+5:30
मध्य प्रदेशातून घेतले ताब्यात : वीज चोरीच्या कारणावरून झाला होता वाद
धरणगाव/जळगाव : धरणगाव तालुक्यातील झुरखेडा येथे वीज चोरीचा आकडा काढल्याचा राग येऊन महावितरणच्या महिला अभियंत्यास शिवीगाळ व मारहाण केल्याच्या गुन्ह्यात फरार असलेल्या अविनाश पांडुरंग चौधरी (वय 54) व वंदना अविनाश चौधरी (वय 48) दोन्ही रा.झुरखेडा या दाम्पत्याला स्थानिक गुन्हे शाखा व धरणगाव पोलिसांनी मध्य प्रदेशातून ताब्यात घेऊन अटक केली.
महावितरणच्या सोनवद कक्षाच्या अभियंता माधुरी पाटील व त्यांचे पथक थकीत वीज बिल वसुलीसाठी 10 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 वाजता झुरखेडा येथे गेले असता अविनाश चौधरी यांनी महावितरणच्या लघु वाहिनीवर आकडा टाकून वीजपुरवठा घेतल्याचे लक्षात आल्यानंतर अभियंता माधुरी पाटील यांनी तो आकडा काढला. त्यावरून चौधरी दाम्पत्याने त्यांच्याशी वाद घातला होता. त्याचे रूपांतर हाणामारीत झाले.
दोघांनी शिवीगाळ करून पाटील यांना मारहाण केली होती. या घटनेनंतर पाटील यांनी धरणगाव पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली होती. त्यानुसार चौधरी दाम्पत्यावर शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल झाला होता.
या घटनेनंतर चौधरी दाम्पत्य गावातून फरार झाले होते. आरोपीला अटक होत नसल्याने महावितरणमधील विविध संघटनांनी आंदोलनाचे अस्त्र उपसले. त्यामुळे पोलीस अधीक्षक डॉ.जालिंदर सुपेकर व अपर पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी स्वतंत्र पथक तयार केले होते. सहायक पोलीस निरीक्षक देवीदास ढुमणे, उपनिरीक्षक सुखदेव भोरकडे, लालसिंग पाटील, मोती पवार, विजय पाटील, नरेंद्र वारुळे, विद्या पाटील, मेजर कोळी यांच्या पथकाने जळगाव, औरंगाबाद, पुणे व मध्य प्रदेशात संशयितांचा शोध घेतला. आठ दिवसानंतर दोघंही खंडवा येथे असल्याची माहिती मिळाल्यानंतर पथकाने रविवारी तेथे जाऊन दोघांना ताब्यात घेतले.