जळगावात महिला पोलीस व पतीमध्ये फ्रि-स्टाईल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2018 05:54 PM2018-08-20T17:54:51+5:302018-08-20T17:56:58+5:30
घटस्फोटासाठी न्यायालयात आलेली महिला पोलीस व तिच्या पतीत वाद होऊन त्याचे पर्यावसन हाणामारीत झाल्याची घटना सोमवारी दुपारी न्यायालय आवारात घडली.
जळगाव : घटस्फोटासाठी न्यायालयात आलेली महिला पोलीस व तिच्या पतीत वाद होऊन त्याचे पर्यावसन हाणामारीत झाल्याची घटना सोमवारी दुपारी न्यायालय आवारात घडली. या घटनेनंतर महिलेने पतीविरुध्द तक्रार देण्यासाठी पोलीस स्टेशन गाठले.
याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, पाचोरा येथे राहणारी महिला पोलीस कर्मचारी औरंगाबाद ग्रामीण पोलीस दलात कार्यरत आहे. पती रेल्वेत नोकरीला आहे. दोघांमध्ये कौटुंबिक कलह निर्माण झाल्याने त्यांनी घटस्फोटाचा निर्णय घेतला. त्यासाठी जळगाव न्यायालयात प्रकरण दाखल झाले होते. सोमवारी न्यायालयात तारीख असल्याने पती-पत्नी व नातेवाईक आलेले होते. घटस्फोटाच्या कागदपत्रावर पतीने सही न केल्याने त्यावरुन वादाला सुरुवात झाली. त्यात पतीने पत्नी व तिच्या काकांना मारहाण करायला सुरुवात केली.
मारहाणीला प्रत्युत्तर म्हणून पोलीस असलेल्या पत्नीने पतीलाही झोडपून काढले. या वादानंतर पत्नीने जिल्हा पेठ पोलीस स्टेशन गाठून झाल्याप्रकाराची माहिती दिली, मात्र न्यायालय हे शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीत असल्याने या महिला पोलिसाला तेथे जाण्याचा सल्ला देण्यात आला. त्यानंतर ही महिला पोलीस व नातेवाईक शहर पोलीस स्टेशनला गेले.