महिला एस.टी.चालकांची
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2021 04:18 AM2021-02-16T04:18:10+5:302021-02-16T04:18:10+5:30
महिला एस.टी.चालकांची प्रशिक्षण प्रक्रिया अर्ध्यावरच रखडली कोरोनामुळे स्थगिती : गेल्यावर्षी झाली होती भरती जळगाव : राज्य परिवहन महामंडळातर्फे गेल्यावर्षी ...
महिला एस.टी.चालकांची
प्रशिक्षण प्रक्रिया अर्ध्यावरच रखडली
कोरोनामुळे स्थगिती : गेल्यावर्षी झाली होती भरती
जळगाव : राज्य परिवहन महामंडळातर्फे गेल्यावर्षी जानेवारी महिन्यात राबविण्यात आलेल्या महिला चालक-वाहक भरती प्रक्रियेत १२ महिला पात्र ठरविण्यात आल्या होत्या. मात्र, पात्र झालेल्या महिला उमेदवारांचे कोरोनामुळे अर्ध्यावरच प्रशिक्षण स्थगित करण्यात आले आहे. त्यामुळे या महिला काही महिन्यांपासून घरीच असून, सेवेत पुन्हा घेण्यासाठी महामंडळाच्या निर्णयाची वाट पाहत आहेत.
राज्य परिवहन महामंडळातर्फे सन २०१९-२० मध्ये राज्य भरती महिला व पुरुषासांठी चालक-वाहक भरती प्रक्रिया राबविण्यात आली होती. त्यामध्ये जळगाव विभागातून महिला चालक-वाहक पदासाठी आलेल्या अर्जांपैकी २९ महिला अंतिम निवड प्रक्रियेसाठी पात्र ठरल्या होत्या तर अंतिम निवड प्रक्रियेतून १२ महिला पात्र ठरल्या होत्या. या पात्र महिलांमध्ये १० महिलांना औरंगाबाद येथे प्रशिक्षणासाठी पाठविण्यात आले होते तर दोन महिलांना जळगाव विभागातच प्रशिक्षण देण्यात येत होते. सर्व महिलांचे प्रशिक्षण व्यवस्थितरित्या सुरू असताना, महामंडळातर्फे कोरोनामुळे या महिलांचे प्रशिक्षण अर्ध्यावरच स्थगित करण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानुसार या महिला गेल्यावर्षी जूनपासून घरीच आहेत.आता कोरोना रुग्णांची संख्या कमी झाल्यानंतर महामंडळाने पुन्हा सेवेत घेण्याबाबत मागणी करण्यात येत आहे.
इन्फो :
जिल्ह्यातून १२ महिला चालकांची निवड
-महामंडळातर्फे जिल्हा निहाय ही भरती प्रक्रिया राबविण्यात आल्यामुळे, स्थानिक उमेदवारांनाच प्राधान्य देण्यात आले होते. अर्ज केलेल्या सर्व उमेदवारांच्या अर्जांची छाननी, कागदपत्रांची तपासणी, शैक्षणिक अर्हता आदी बाबी तपासून १२ महिलांची निवड करण्यात आली आहे.
- निवड झालेल्या या १२ महिलांमध्ये जिल्ह्यातील विविध तालुक्यातील महिलांचा समावेश आहे. कोरोनामुळे या महिलांच्या प्रशिक्षणाला स्थगिती देण्यात आल्यानंतर, तेव्हापासून या महिला घरीच थांबून आहेत. महामंडळातर्फे लवकरात लवकर सेवेत घेण्याची मागणी महिलावर्गातून केली जात आहे.
इन्फो :
कोरोनामुळे पुरुषांप्रमाणे महिला चालक-वाहकांच्या प्रशिक्षणालाही महामंडळाने स्थगिती दिली आहे. महामंडळाकडून या उमेदवारांची सेवा पूर्ववत सुरू करण्याचे आदेश आल्यानंतर तत्काळ या उमेदवारांना वरिष्ठांच्या सूचनेनुसार सेवेत घेण्यात येईल.
- दिलीप बंजारा, विभागीय वाहतूक अधिकारी, जळगाव