नारीशक्तीची अवकाशाला गवसणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 6, 2019 11:33 AM2019-10-06T11:33:34+5:302019-10-06T11:34:18+5:30
अजय पाटील । जळगाव : स्वप्नवत असलेला विमान प्रवास प्रत्यक्षात सत्यात उतरल्यामुळे, आव्हाणे ता. जळगाव येथील ३५ शेतकरी महिलांनी ...
अजय पाटील ।
जळगाव : स्वप्नवत असलेला विमान प्रवास प्रत्यक्षात सत्यात उतरल्यामुळे, आव्हाणे ता. जळगाव येथील ३५ शेतकरी महिलांनी शनिवारी विमानाने मुंबई वारी अनुभवली. फक्त टिव्हीमध्ये पाहिलेली विमानाची हवाई वारी प्रत्यक्षात साकार झाली. या विमान प्रवासामुळे नवरात्रीनिमित्ताने नारीशक्तीने आकाशाला जणू गवसणीच घातली...
दिवसभर शेतात काबाड कष्ट करणाऱ्या सर्वसामान्य गरीब घरातील महिलांना विमान काय, रेल्वेच्या वातानुकूलीत डब्यातून प्रवास करणे एक दिवा स्वप्नच. आव्हाण्याचे मुळ रहिवाशी व अंबरनाथ नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष सुनील चौधरी यांनी गावातील सर्वसामान्य घरातील महिलांचे विमानवारीचे स्वप्न शनिवारी पूर्ण केले.
गेल्या आठवड्यात त्यांनी ३५ शेतकरी महिलांचे जळगाव ते मुंबईचे तिकीट बुकींग केले. या महिला विमानाने मुंबईकडे रवाना झाल्या. आजोबा प्रताप चौधरी यांच्या वाढदिवसानिमित्त चार वर्षापूर्वीही त्यांनी गावातील वयोवृद्ध नागरिकांना विमानाने मुंबई व अहमदाबाद अशी हवाई सफर घडविली होती.
मुंबईचेही घडविले दर्शंन
या महिला विमानात बसल्यानंतर काही महिलांच्या डोळ््यातून आनंदाश्रू तरळत होते. या महिलांमध्ये चौधरी यांच्या आईदेखील होत्या. मुंबईत नेल्यावर सर्वांना वाहनाने सिद्धी विनायक दर्शंन, मुंबादेवीचे मंदिर यासह मुंबईतील प्रेक्षणीय स्थळे दाखविली. सोमवारी या महिला विमानानेच जळगावला परत येणार आहेत. त्यांच्या स्वागताची तयारी सुरु आहे.