कुणासाठी वैरण तर कुणासाठी सरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2019 10:25 PM2019-06-15T22:25:30+5:302019-06-15T22:36:51+5:30
नुकत्याच झालेल्या वादळाने परिसरातील केळीबागा भुईसपाट झाल्या आहेत. केळी बागांमधून वाया गेलेले खांब जनावरांना चारा म्हणून खाऊ घालण्यासाठी गिरणा काठावरील गावांतून पशुपालक शेतकरी ट्रॅक्टर, पिकअप आदी मिळेल त्या वाहनातून नेत होते.
संजय हिरे
खेडगाव, ता. भडगाव, जि.जळगाव : नुकत्याच झालेल्या वादळाने परिसरातील केळीबागा भुईसपाट झाल्या आहेत. केळी बागांमधून वाया गेलेले खांब जनावरांना चारा म्हणून खाऊ घालण्यासाठी गिरणा काठावरील गावांतून पशुपालक शेतकरी ट्रॅक्टर, पिकअप आदी मिळेल त्या वाहनातून नेत होते. यामध्ये जळगाव जिल्ह्यातील पारोळा, अमळनेर, एरंडोल, पाचोरा, चाळीसगाव या तालुक्यांतील तीव्र चाराटंचाई असलेल्या गावांतील शेतकरी पशुपालकांचा समावेश होता.
‘लोकमत’ने ‘अशा केळीखांबाचा चारा म्हणून वापर’ या मथळ््याखाली केळीखांब चारा म्हणून वाहून नेत असल्याचे छायाचित्र प्रसिद्ध केल्यानंतर दुसऱ्या दिवशी शनिवारी या ठिकाणी तोबा गर्दी वाढली. समाजमाध्यमांवर हे छायाचित्र मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. पारोळा तालुक्यातील तरवाडे, शिवरे, म्हसवे, जोगलखेडे, हनुमंतखेडे, वलवाडी ते अमळनेर तालुक्यातील गलवाडे येथून केळी खांबांचा चारा नेण्यासाठी शेतकरी आल होते. आजूबाजूच्या जुवार्डी, पथराड, पेंडगाव, शिंदी आदी १५ ते २० गावांतील काही पशुपालकांनी अक्षरश: मोटारसायकलने केळीखांब वाहून नेले. यामुळे आठवडाभरात हे शेत रिकामे होण्याची शक्यता आहे.
काहींना टाईमपास... काहींच्या जीवाला कास
चारा संपल्याने पाऊस येऊन चाºयाची सोय होईपर्यंत हिरव्या चाºयाची वैरण म्हणून तेवढेच दहा-पंधरा दिवस जनावरांना टाईमपास होईल, असे काहींचे धोरण आहे. केवळ या आशेने वाहनांचे भाडे परवडत नसूनदेखील रान हिरवे होईपर्यंत जनावरे जगवायची म्हणून पशुपालकांची येथे रीघ लागली. दुसरीकडे वर्षभर जीवापाड जपलेली केळी क्षणात मातीमोल झाल्याने मोठे नुकसान होऊन खचलेले उत्पादक खंत व्यक्त करीत होते.
...अन् त्यांच्या डोळ््यांतून ओघळले अश्रू
‘लोकमत’ने प्रातिनिधिक स्वरुपात बात्सर येथील शालिक दयाराम पाटील यांच्या वाया गेलेल्या केळीबागेस भेट दिली. तेव्हा तिथे दहा बैलगाड्या, सहा ट्रॅक्टर केळीखांब घेण्यासाठी आले होते. कोयता चालू लागताच केळीखांबातून वाहणाºया द्रवरुपी धारांप्रमाणे त्यांच्या डोळ्यांतूनही अश्रू ओघळले. त्यांनी शेतातच बसून घेतले. चारा घेण्यासाठी आलेले भरत पाटील यांनी, त्यांना ‘हयाती राह्यनी तर कमाडी लेसुत’, (कमवून घेऊ), असा धीर दिला. अडीच हजार केळीखोड, ८० हजार खर्च करून पंधरा दिवसांत बाग कटाईला लागणार होता. मात्र, वादळाने सर्वकाही संपवले. अडीच लाखांचे उत्पन्न मिळण्याची आशा होती. आता डोक्यावर तीन-चार लाखांचे कर्ज झाले आहे. कर्ज फेडायचे कसे, या विवंचनेत ते आहेत. शासनाकडून भरपाई मिळेल तेव्हा मिळेल. मात्र, आज कोणताच थारा राहिलेला नाही.
पशुपालक म्हणतात...
माझ्याकडे सहा जनावरे आहेत. गव्हाचे कुटार, मक्का कुट्टी असा कोरडा चारा खाऊन जनावरांना ढास लागतेय. ‘लोकमत’मधील फोटो बघितला अन बदल म्हणून केळीखाबांचा हिरवा चारा नेण्यासाठी आलो. यात दहा ते पंधरा दिवस गुरांचा टाईमपास होईल. इतक्या दूर भागत येण्यासाठी परवडत नाही, पण चाºयासाठी आमचा नाईलाज आहे.
-गोकुळ आभिमन पाटील, वलवाडी, ता.पारोळा