महाविद्यालयांमध्ये परीक्षांचा 'फिव्हर'
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2018 01:08 PM2018-04-22T13:08:54+5:302018-04-22T13:08:54+5:30
सागर दुबे
सध्या महाविद्यालयांमध्ये पदवी-पदवीव्युत्तर अभ्यासक्रमाच्या परीक्षांचा फिव्हर असल्याने शहरातील सर्व महाविद्यालयाच्या कॅम्पसमधील कट्टे ओस पडलेले आहे़त. सगळे कट्टे सामसूम तर आहेच पण फेसबुक, व्हॉट्सअॅपलाही काही वेळ विश्रांती दिल्याचे दिसून येत आहे़ मात्र, दुसरीकडे बॅग व मोबाईल चोरट्याच्या उच्छादामुळे परीक्षार्थी हैराण झाले असून यासाठी महाविद्यालयीन प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे़ गेल्या दोन ते तीन वर्षांपासून परीक्षेदरम्यान मोबाईल व बॅग चोरीच्या प्रमाण वाढलेले आहे़ यंदाही तसेच प्रकार घडताना दिसून असून या घटनांना आळा कधी बसेल? हा प्रश्नही विद्यार्थ्यांकडून उपस्थित होत आहे़
पदवी-पदव्युत्तर परीक्षांना सुरूवात झाली असल्यामुळे कट्ट्यावर मौज-मस्ती करणारी, रात्री उशिरापर्यंत फेसबुक, व्हॉटस अॅपवरून चॅटिंग करणारी तरुणाई आता रात्री उशिरापर्यंत अभ्यासात मग्न झाली आहे़ भर उन्हाळ्यात परीक्षा सुरू असून काही महाविद्यालयांच्या ढिसाळ कारभारामुळे परीक्षा वर्गातील उकाड्यामुळे परिक्षार्र्थींच्या घामांच्या धारा निघत आहे़ असे असताना देखील विद्यार्थ्यांना पेपर लिहावा लागत आहे़ महाविद्यालयांकडून पिण्याच्या पाण्याची सुविधा असल्याने तेवढा तरी दिलासा विद्यार्थ्यांना मिळत आहे़
साधारणपणे जुलै-आॅगस्टमध्ये महाविद्यालयीन शैक्षणिक वर्षाला सुरुवात होते. सेमिस्टर पॅटर्न असल्याने वर्ष सुरू झाले की लागलीच दोनच महिन्यांत विद्यार्थ्यांना पहिल्या सेमिस्टरच्या तयारीला सामोरे जावे लागते. मात्र दिवाळीनंतर सुरू होणारे दुसरे किंवा काही जणांचे अखेरचे सेमिस्टर हे खूप महत्त्वपूर्ण असते. कारण या परिक्षेत एक विषय जरी राहिला, तरी संपूर्ण वर्ष वाया जाण्याची शक्यता असते. त्यामुळे एरव्ही गप्पा-टप्पा आणि मौज-मस्तीत रंगणारी तरुणाई परीक्षेच्या अभ्यास करण्याला प्राधान्य देत असून, नो एक्सक्यूज म्हणत लायब्ररीमध्ये ठाण मांडून बसू लागली आहे. भर उन्हात येणे शक्य नसल्यामुळे परीक्षार्थी सकाळीच महाविद्यालयात येऊन अभ्यासला बसत आहे़ दरम्यान, विद्यापीठाच्या भरारी पथकाची सर्व महाविद्यालयांच्या परीक्षा केंद्रावर नजर असून हे पथक परीक्षा केंद्रांवर अचानक भेट देत आहे़ एवढेच नव्हे तर दिवसाला पाच ते सहा कॉपी बहाद्दरांवर कारवाई होत आहे़ अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्येही प्राजेक्ट अभ्यास आटोपले असून प्रॅक्टीकल सुरू आहेत़ अभियांत्रिकीच्या परीक्षा उशिरा सुरू होता़त त्यामुळे विद्यार्थ्यांनी आतापासूनच नोटस् काढायला सुरूवात केली आहे तर कुणी प्राध्यापकांकडून सल्ले घेत आहेत़ मात्र, परीक्षा संपल्यानंतर लागलीच दोन ते तीन दिवसांनी सीईटी परीक्षा असल्यामुळे नेमका अभ्यास कशाचा करावा, असा संभ्रम विद्यार्थ्यांमध्ये आहे़ परीक्षा संपल्यावर एक दिवसात अभ्यास होणे शक्य नसल्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची संभावना आहे़