क्रीडा संघटना समाजसेवेच्या मैदानात, दररोज शेकडो रुग्णांचे उदरभरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2021 04:16 AM2021-05-10T04:16:04+5:302021-05-10T04:16:04+5:30

जळगाव : तरुण व क्रीडा स्पर्धांची आवड असणाऱ्यांमध्ये खेळ भावना जोपासण्यासाठी उदयास आलेल्या क्रीडा संघटना कोरोनाच्या संकटात समाजसेवेच्या ...

In the field of sports organization social service, hundreds of patients are fed every day | क्रीडा संघटना समाजसेवेच्या मैदानात, दररोज शेकडो रुग्णांचे उदरभरण

क्रीडा संघटना समाजसेवेच्या मैदानात, दररोज शेकडो रुग्णांचे उदरभरण

googlenewsNext

जळगाव : तरुण व क्रीडा स्पर्धांची आवड असणाऱ्यांमध्ये खेळ भावना जोपासण्यासाठी उदयास आलेल्या क्रीडा संघटना कोरोनाच्या संकटात समाजसेवेच्या मैदानात उतरल्या आहेत. जळगावातील मराठा स्पोर्टस्‌ फाउंडेशन संचलित एमपीएल व लेवा पाटीदार सोशल ॲण्ड स्पोर्ट फाउंडेशन संचलित एलपीएल जळगाव या संस्था मोहाडी रुग्णालयांमध्ये रुग्ण तसेच तेथील कर्मचाऱ्यांना दररोज तीनशे थाळ्या जेवणाचे वाटप करीत आहेत. प्रशासन व सामाजिक संस्था एकत्र येऊन सुरू असलेल्या या गरजूंच्या उदरभरणाच्या यज्ञासाठी मदत व्हावी म्हणून अनेक दातेदेखील सरसावले आहेत.

या दोन्ही संस्था जळगावमध्ये खेळ भावना जोपासण्यासाठी उदयास आल्या. मात्र, कोरोनाचा कहर सुरू झाला आणि क्रीडा स्पर्धांवरदेखील बंधने आली. त्यामुळे कोरोनाच्या या संकटात आपण समाजाला काहीतरी मदत केली पाहिजे, असा विचार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या मनात आला. त्यानुसार त्यांनी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्याकडे कोविड केअर सेंटर सुरू करण्याविषयी प्रस्ताव ठेवला. त्यावेळी जिल्हाधिकारी राऊत यांनी या संघटनांकडे मोहाडी रुग्णालयातील रुग्णांना अन्नरूपी मदत करण्याची जबाबदारी सोपवली.

आवाहन करताच मदतीचा ओघ सुरू

८ एप्रिल रोजी मोहाडी रुग्णालय सुरू झाले. त्यावेळी त्याठिकाणी दाखल गोरगरीब रुग्णांना अन्नरूपी मदत करण्यासाठी एमपीएल, एलपीएल या संस्था कामाला लागल्या. यावेळी त्यांनी समाजबांधवांना मदतीचे आवाहन केले व हा ओघ सुरू झाला. यामध्ये कोणी रोख रक्कम, गहू, तांदूळ, डाळी, पोहे, कांदे, फळे, चहाचे कप, जेवणाचे साहित्य, दूध, तेल, तुपाचे डबे, अशी मोठी मदत दिली. याशिवाय खर्च पाहता दानशूरांनादेखील आवाहन केले असता त्यातही भरभरून मदत होऊ लागली. संघटनेचे हिरेश कदम यांच्या निवासस्थानी ही सर्व मदत जमा होते व तेथून ती रुग्णालयातील स्वयंपाकघरात पोहोचवली जाते.

दररोज तीनशे थाळ्या

सुरुवातीला १२० रुग्ण, चाळीस जणांचा स्टाफ, रुग्णवाहिका चालक, वाॅर्डबॉय, अशा एकूण १८१ जणांचा सकाळचा नाश्ता, दुपारचे जेवण, ४ वाजता चहा, रात्री जेवण देण्यास सुरुवात झाली. यासाठी जिल्हाधिकारी राऊत यांनी रुग्णालयातच स्वयंपाकघरासाठी स्वतंत्र व्यवस्था करून दिली, तसेच एक स्वयंपाकी, त्याच्या मदतीला सात- आठ कामगार नेमून देण्यात आले.

आज समाजबांधवांच्या सहकार्याने अन्नछत्र अविरतपणे सुरू असून, यासाठी डॉ. राजेश पाटील, डॉ. रितेश पाटील हे याठिकाणी मोठे योगदान देत आहेत. या अन्नछत्राच्या ठिकाणी जिल्हाधिकारी अभिजित राऊत, पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी.एन. पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी राहुल पाटील, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन.एस. चव्हाण, जेसीआय अध्यक्ष मिलिंद राठी, आयुर्वेदिक महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. मिलिंद निकुंभ, उद्योजक श्रीराम पाटील, चेतन पाटील, डॉ. मनीष चौधरी, ज्ञानेश्वर बढे, मनोज पाटील, चंदन अत्तरदे, कुलभूषण पाटील, हिरेश कदम, चंदन कोल्हे, किरण बच्छाव, अमोल धांडे, विजय देसाई, लीलाधर खडके, गोपाल दर्जी, महेश चौधरी, सुनील घोलप, हितेंद्र धांडे, विवेक पाटील, अक्षय कोल्हे आदींनी भेट देऊन या उपक्रमाचे कौतुक केले.

सामाजिक दातृत्वाची भावना समोर ठेवून सर्व समाजातील जनतेची सेवा घडावी, हा विचार समोर ठेवून ही योजना सुरू आहे. भविष्यात प्रशासनास लसीकरणासाठी मदत करण्याचा मानस आहे.

-हिरेश कदम

या रुग्णालयामध्ये सुरू असलेल्या सेवा म्हणजे प्रशासन व सेवाभावी संस्था यांच्या कार्याचे उत्तम उदाहरण आहे.

-डॉ. रितेश पाटील.

मी व माझे कुटुंब कोरोनातून बरे झाल्यानंतर आपणही समाजाची सेवा, मदत केली पाहिजे. समाज अडचणीत असताना आपण मागे राहू शकत नाही, हा विचार मनात आला व गोरगरीब रुग्णांची सेवा करण्याची संधी मिळाली.

-चंदन कोल्हे

Web Title: In the field of sports organization social service, hundreds of patients are fed every day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.