यावल येथे पाचव्या दिवशी श्री विसर्जन शांततेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2020 05:40 PM2020-08-26T17:40:40+5:302020-08-26T17:41:06+5:30
यावल शहरासह तालुक्यातील पाच दिवसांच्या बाप्पाला निरोप देण्यात आला.
चुंचाळे, ता.यावल : यावल शहरासह तालुक्यातील डांभुर्णी, दहिगाव, सावखेडासीम, कोरपावली या गावांमधील पाच दिवसांच्या बाप्पाला बुधवारी शांततेत निरोप देण्यात आला.
यावल शहरात विनावाद्य जागेवर आरती करून कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर दुपारी १ वाजेलाच सर्व सार्वजनिक १७ मंडळांनी विर्सजन केले. पोलीस प्रशासन आणि पालिकेच्या वतीने विविध ठिकाणी मूर्ती संकलन केंद्रे उभारली होती. या ठिकाणी घरगुती गणेश मूर्ती नागरिकांनी आणून दिल्या होत्या.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहरातील पाच दिवसीय गणेशोत्सवाची सांगता बुधवारी झाली. एरव्ही वाद्यवृंदाच्या गजरात रात्री बारा वाजेपर्यंत चालणारी विसर्जन मिरवणूक यावेळी मात्र, दुपारी एक वाजेलाच संपली. सर्वच सार्वजनिक गणेश मंडळांनी जागेवर आरती करून मंडळाचे चार ते पाच पदाधिकारी कार्यकर्ते मूर्ती विसर्जनसाठी रवाना झाले.
दरम्यान, शहरात घरगुती गणेश मंडळासाठी मूर्ती संकलनासाठी रेणुका देवी मंदिर, भवानी पेठ, जुना भाजीबाजार, बारी वाडा, गवत बाजार, देशमुख वाडा, देशपांडे गल्ली, म्हसोबा मंदिर, महाजन गल्ली, सुंदर नगरी, वाणी गल्ली बालसंस्कार शाळेजवळ, संभाजी पेठ, सुतार वाड्याजवळ व विस्तारीत भागासाठी फालक नगर भुसावळ रस्त्यावर केंद्र उभारण्यात आले होते.
या ठिकाणी पोलीस निरीक्षक अवतारसिंग चव्हाण, मुख्याधिकारी बबन तडवी, पालिकेचे कक्ष अधीक्षक विजय बढे, रमाकांत मोरे, शिवानंद कानडे, योगेश मदने या पथकाने नागरिकांकडून मूर्ती संकलित केल्या. नंतर संकलित मूर्र्तींचे विधीवत विसर्जन करण्यात आले. शहरातील सार्वजनिक गणेश मंडळात सर्व प्रथम विसर्जन सकाळी १० वाजता समस्त बारी पंच मंडळाच्यावतीने मंडळाचे अध्यक्ष दगडू रूपा बारी, भास्कर गंभीर बारी, काशिनाथ महारू बारी या पदाधिकाऱ्यांनी तापी नदीत जाऊन केले.
शहरात १९२८ पासून अखंडपणे या मंडळाची गणेशोत्सवाची परंपरा आहे. यंदा कोरोना विषाणूची पार्श्वभूमी ज्येष्ठ व वृध्दांनी विसर्जन केले व शासन आदेशाचे पालन करीत तरूणांपुढे आदर्श ठेवला आहे.
ग्रामीण भागातील डांभुर्णी, दहिगाव, सावखेडासीम, कोरपावली गावातदेखील दुपारपर्यंत विसर्जन करण्यात आले होते. विविध ठिकाणी मंडळाच्या कार्यकर्त्यांसोबत पोलीस कर्मचारीदेखील विसर्जनाकरिता गेले होते. विसर्जन मिरवणुकीसाठी पोलीस निरीक्षक अवतारसिंग चव्हाण यांच्यासह पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र खैरनार, उपनिरीक्षक विनोद खांडबहाले, उपनिरीक्षक सुनीता कोळपकर, पोलीस कर्मचारी बंदोबस्त होता.
शहरातील विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर उपविभागीय पोलीस अधिकारी नरेंद्र पिंगळे हेदेखील दिवसभर पोलिस ठाण्यात थांबून शहर व परिसरावर लक्ष ठेवून होते.