पाचव्यावर्षीच अनेक श्लोक, स्तोत्र पाठांतर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2019 05:37 PM2019-11-10T17:37:08+5:302019-11-10T17:37:43+5:30
लिहीता वाचता येत नाही, पण...। काव्याच्या पाठांतर क्षमतेला दाद
विहार तेंडुलकर।
जळगाव : कोवळ्या वयामुळे लिहीता वाचता येत नाही. पण पाठांतर एवढं प्रगल्भ की तिच्या बुध्दीमत्तेकडे पाहताना भुवया उंचवाव्यात. होय, वय वर्षे पाच. सिनिअर केजीत शिकणाऱ्या काव्या जितेंद्र पाटील हिचे या वयात गजानन बावन्नी, रामरक्षा स्तोत्र, गणपती स्तोत्र (मराठी आणि संस्कृत) गीतेतील १५ वा अध्याय, हनुमान चालिसा सर्व काही तोंडपाठ आहेत.
शहरातील श्रीहरीनगरमध्ये राहणारी काव्या हिचे वडिल खासगी नोकरी करतात तर आई गृहीणी आहे. काव्याला अगदी तिसºया वर्षापासूनच अध्यात्माची आवड आहे. त्यामुळे ती तिच्या आजीबरोबर स्तोत्र, श्लोक पाठांतर करायला बसायची. त्यातूनच तिचे पाठांतर होत गेले. विशेष म्हणजे तिची पाठांतर करण्याची क्षमता एवढ्या छोट्या वयातच इतकी चांगली आहे की, ती दोनदा ऐकल्यावर ते स्तोत्र वा श्लोक लागलीच म्हणून दाखवते. त्यामुळे अनेक स्तोत्रे तिची या वयातच पाठ आहेत.
हनुमान चालिसा, संस्कृत आणि मराठीमध्ये गणपती स्तोत्र, गीतेतील १५वा अध्याय, रामरक्षा स्तोत्र, हनुमान चालिसा हे अगदी तोंडपाठ आहे. तिचा दिनक्रमही असा आहे की, अनेकांना आश्चर्य वाटेल. सकाळी उठल्यानंतर ७.३० वाजता शाळेत जाण्यापूर्वी ती स्वत:हून श्लोक, स्तोत्राचे पठण करते आणि नंतरच शाळेत जाते.
तिच्या बोबड्या बोलातील या पाठांतराने अनेकांना वेड लावले आहे. ती स्वामी विवेकानंद प्रतिष्ठान विद्यालयाच्या सिनिअर केजीमध्ये सेमी इंग्लिश घेऊन शिकत आहे.
वय कमी असल्याने तिला लिहीता वाचता येत नाही. त्यामुळे ती ऐकूनच मनात साठवते अन् पाठांतर करते. यावरूनच तिच्यातील पाठांतर करण्याची क्षमता किती तल्लख आहे, याची प्रचिती येते.
दीड महिन्यापूर्वी गजानन महाराज पुण्यतिथीनिमित्त गजानन महाराज मंदिरात भक्तीगीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी काव्याने गजानन बावन्नी म्हणून दाखविली. त्यावेळी या मंदिरातर्फे तिचा सत्कार करण्यात आला. एवढेच नव्हे तर तिच्या बोबड्या आवाजातील हे बिनचूक श्लोक ऐकून अनेकांनी तिच्यावर बक्षिसांचा वर्षाव केला.