कोरोना उपाययोजनांसाठी जिल्हा वार्षिक योजनेतून पावणेसात कोटी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2021 04:16 AM2021-04-20T04:16:41+5:302021-04-20T04:16:41+5:30
जळगाव : कोरोना संसर्गाच्या उपाययोजनांसाठी जिल्हा वार्षिक योजनेच्या निधीमधून १० टक्के निधी दिला जाणार असून सध्या सहा कोटी ७७ ...
जळगाव : कोरोना संसर्गाच्या उपाययोजनांसाठी जिल्हा वार्षिक योजनेच्या निधीमधून १० टक्के निधी दिला जाणार असून सध्या सहा कोटी ७७ लाख १५ हजार रुपयांचा निधी खर्च करण्यास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता व जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या अखत्यारित येणाऱ्या यंत्रणांसाठी हा निधी खर्च केला जाणार आहे.
कोरोनाच्या संसर्गामुळे सर्वच घटकांवर परिणाम होत आहे. गेल्यावर्षीदेखील कोरोना संसर्गामुळे जिल्ह्यासाठी मिळणाऱ्या वार्षिक विकास योजनांच्या निधीमध्ये ६७ टक्के कपात करण्यात आली होती. त्यामुळे जिल्ह्यासाठी एकूण मंजूर ३७५ कोटींचा निधीपैकी केवळ १२३ कोटी रुपयांचा निधी जिल्ह्याला सुरुवातीला मिळाला. त्यापैकी देखील ५० टक्के निधी हा कोरोना उपाययोजना करण्यासाठी प्राधान्याने उपलब्ध करून देण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. आता यंदादेखील तशीच परिस्थिती उद्भवू पाहत आहे. यावेळी जिल्ह्यासाठी ४०० कोटी रुपये वार्षिक योजनांसाठी मंजूर झाले आहे. यापैकी ३० टक्के निधी कोरोना उपाययोजनांसाठी ठेवण्यात यावा, अशा सूचना नियोजन विभागाने दिल्या आहेत. या ३० टक्केपैकी १० टक्के निधी आता अग्रक्रमाने करावयाच्या खर्चासाठी शासनस्तरावरून कळविण्यात आले आहे. त्यानुसार जिल्ह्यासाठी मंजूर एकूण ४०० कोटी निधींपैकी ४० कोटी निधी आता कोरोना उपाययोजनांसाठी खर्च करता येणार आहे. यापैकी सहा कोटी ७७ लाख १५ हजार रुपयांच्या निधीला जिल्हा नियोजन समितीने प्रशासकीय मान्यता दिली आहे.
साडेचार कोटींहून अधिक निधी डीन यांच्या अखत्यारित योजनांसाठी
कोरोना उपाययोजना करण्याच्या दृष्टीने जिल्हा वार्षिक योजनेच्या निधीमधून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता व जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या अखत्यारित येणाऱ्या योजनांसाठी सहा कोटी ७७ लाख १५ हजार रुपये खर्च होणार आहे. यात तीन कोटी ८६ लाख ९४ हजार रुपये अधिष्ठाता यांच्या अखत्यारित येणाऱ्या यंत्रणांसाठी तर दोन कोटी ९० लाख २१ हजार रुपये जिल्हा शल्यचिकित्सक यांच्या अखत्यारित येणाऱ्या यंत्रणांसाठी मान्यता देण्यात आली आहे.
रेमडेसिविरसाठी ६७ लाख
जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या अखत्यारित येणाऱ्या योजनांसाठी खर्च करण्यात येणाऱ्या दोन कोटी ९० लाख २१ हजार रुपयांच्या निधीमधून ग्रामीण रुग्णालयांसाठी औषधे व साधनसामग्री खरेदी करता येणार आहे. यात रेमडेसिविर इंजेक्शनसाठी ६६ लाख ५८ हजार रुपये मंजूर करण्यात आले आहेत.
ऑक्सिजन व इतर उपाययोजनांसाठी तीन कोटी
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता यांच्या अखत्यारित येणाऱ्या यंत्रणांसाठी मंजूर केलेल्या तीन कोटी ८६ लाख ९४ हजार रुपयांच्या निधीमधून तीन कोटी रुपये लिक्विड ऑक्सिजनची खरेदी, आवश्यक मेडिकल प्राणवायू, नायट्रस ऑक्साईड वायू यांच्या खरेदीसाठी मंजूर करण्यात आले आहे. इतर निधीतून रेडिओलॉजी मशीन, प्रिंटर अशा वेगवेगळ्या उपाययोजना केल्या जाणार आहेत.