बंडखोर व भाजप नगरसेवकांची लढाई आता न्यायालयात?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2021 04:13 AM2021-07-16T04:13:26+5:302021-07-16T04:13:26+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : महापालिकेतील राजकारण आता तापले असून, भाजप बंडखोर व भाजप नगरसेवक यांच्यातील गटनेतेपद व व्हिपचा ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : महापालिकेतील राजकारण आता तापले असून, भाजप बंडखोर व भाजप नगरसेवक यांच्यातील गटनेतेपद व व्हिपचा मुद्दा आता थेट न्यायालयात जाण्याची शक्यता आहे. त्यानुसार या दोन्ही गटातील प्रमुख नगरसेवकांनी याबाबत तयारी सुरू केली आहे. भाजप बंडखोर नाशिकला ठाण मांडून आहेत. तर भाजपचे पदाधिकाऱ्यांनी औरंगाबादच्या फेऱ्या मारण्याचे काम सुरू केले आहे. या मुद्यावरून आगामी काळात महापालिकेतील राजकारण चांगलेच तापण्याची शक्यता आहे.
महापालिकेत सत्तांतर झाल्यानंतर आरोप-प्रत्यारोपांमध्येच मनपातील राजकारण तापले आहे. भाजपने बंडखोरांविरोधात विभागीय आयुक्तांकडे अपात्रतेचा प्रस्ताव दाखल केल्यानंतर बंडखोर नगरसेवकांनीदेखील भाजपचे गटनेतेपद हिसकावून भाजपला उत्तर दिले. तसेच प्रभाग समिती सभापतीपदाच्या निवडणुकीत बंडखोर नगरसेवकांचे गटनेते ॲड. दिलीप पोकळे यांनी व्हिप काढून भाजप नगरसेवकांनादेखील बंडखोरांनी दिलेल्या उमेदवाराला मतदान करण्याचा सूचना केल्या होत्या. मात्र, भाजपने हा व्हिप झुगारून भाजपच्या अधिकृत उमेदवारांना मतदान केले. त्यामुळे भाजप बंडखोरांनी भाजप नगरसेवकांविरोधातच आता अपात्रतेची कारवाई करण्यासाठी विभागीय आयुक्तांकडे प्रस्ताव दाखल करण्याची तयारी केली आहे. याबाबत भाजप बंडखोरांपैकी काही नगरसेवक नाशिकला ठाण मांडून असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
भाजप वरिष्ठांकडूनही लावला जातोय जोर
भाजप बंडखोरांविरोधात दाखल अपात्रतेच्या प्रस्तावावर लवकरात लवकर कार्यवाही व्हावी यासाठी भाजपचे वरिष्ठ नेते देखील भाजपच्या नगरसेवकांशी सातत्याने संपर्कात आहेत. प्रत्येक दिवसाची माहिती घेत असल्याचे नगरसेवकांनी सांगितले आहे. तसेच बंडखोरांच्या गटनेतेपदबाबत देखील औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल करण्याचा सूचना भाजपच्या वरिष्ठांकडूनच देण्यात आल्याचीही माहिती सूत्रांनी दिली आहे.
‘त्या’ तीन नगरसेवकांविरोधातही होणार याचिका
भाजपने महापौर व उपमहापौरपदाच्या निवडणुकीत शिवसेनेला मतदान करणाऱ्या २७ नगरसेवकांविरोधात याचिका दाखल केली आहे. दरम्यान, काही महिन्यांपूर्वी भाजपचे तीन नगरसेवकदेखील भाजप सोडून शिवसेनेत दाखल झाले होते. यामध्ये सुरेश सोनवणे, शोभा बारी यांचा समावेश होता. त्यांच्याविरोधातदेखील याचिका दाखल करण्याची तयारी भाजपने केली आहे. याबाबत सोमवारी याचिका दाखल केली जाणार असल्याची माहिती भाजपकडून देण्यात आली आहे.