कोल्हे-साहित्या वादात सेनेची उडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2020 12:18 PM2020-01-25T12:18:46+5:302020-01-25T12:19:26+5:30
राजकीय वळण : भाजपला अंगावर घेण्यासाठी शिवसेनेकडून नवी खेळी
जळगाव : माजी महापौर ललित कोल्हे व बांधकाम व्यावसायिक खुबचंद साहित्या यांच्यातील वादाला शुक्रवारी राजकीय वळण मिळाले. मुंबई येथे उपचार घेत असलेल्या साहित्या यांची सेनेचे खासदार संजय राऊत व संपर्क प्रमुख संजय सावंत यांनी भेट घेतली. त्यामुळे कोल्हे व साहित्या यांच्या वादात शिवसेनेने उडी घेतल्याचे म्हटले जात आहे. या प्रकरणाच्या माध्यमातून भाजपला अंगावर घेण्याचा प्रयत्न शिवसेनेने सुरु केला आहे.
आर्थिक वादातून शहरातील गोरजाबाई जिमखान्यात ललित कोल्हे व त्यांच्या साथीदारांनी १५ जानेवारी रोजी रात्री खुबचंद साहित्या यांना मारहाण केली होती.
याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल होवून चार जणांना अटक देखील झाली आहे. या मारहाणीत जखमी झालेले साहित्या हे सध्या मुंबई येथील लिलावती रुग्णालयात उपचार घेत आहेत.
शुक्रवारी शिवसेनेचे खासदार संजय राऊत व जिल्ह्याचे संपर्क प्रमुख संजय सावंत यांनी साहित्या यांची भेट घेवून त्यांच्या तब्बेतीची विचारपूस केली. साहित्या यांनी शिवसेनेकडून महापालिकेची निवडणूक लढवली होती. मात्र, ते शिवसेनेचे सक्रीय सदस्य नाहीत.
मात्र, संजय राऊत यांच्या सारख्या मोठ्या नेत्याने त्यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चा रंगू लागल्या आहेत.
खुबचंद साहित्यांनी संपर्क प्रमुखांना दिले कार्यालय
सावंत यांचेही काही दिवसांपासून खुबचंद साहित्या यांच्याशी घनिष्ठ संबंध पहायला मिळत आहेत. काही दिवसांपुर्वी साहित्या यांनी आपल्या नवीपेठ भागातील हॉटेलच्या जागेत सावंत यांना संपर्क कार्यालय सुरु करून दिले आहे.
दरम्यान, कोल्हे यांच्याशी वाढत जाणारे वैर यामुळे या प्रकरणात सेनेकडून मदत मिळेल या अपेक्षेने साहित्या यांनी शिवसेनेला जवळ केल्याचीही चर्चा आहे. त्यातच ललित कोल्हे हे सत्ताधारी भाजपचे मनपा सभागृह नेते आहेत. त्यामुळे कोल्हे यांच्या बहाण्याने भाजपला अंगावर घेण्याचा प्रयत्न शिवसेनेकडून यानिमित्ताने केला जात आहे.
सर्वतोपरी मदत करण्याचे दिले आश्वासन
-शुक्रवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास शिवसेना नेते संजय राऊत यांनी खुबचंद साहित्या यांच्या तब्बेतीची विचारपुस केली.
-तसेच या प्रकरणाची माहिती घेऊन लागेल ती सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन राऊत यांनी दिले.
-काळजी करु नकोस शिवसेना तुमच्या पाठीशी असल्याचे राऊत यांनी साहित्या यांना सांगितले असल्याचे शिवसेनेने म्हटले आहे.
-ललित कोल्हे हे सध्या फरार आहेत. या भेटीगाठी म्हणजे कोल्हे यांच्यासाठी मोठाच धक्का मानला जात आहे.
मारहाणीनंतर शिवसेनेचे पदाधिकारी आले होते धावून
साहित्या यांना मारहाण झाल्याची माहिती मिळताच शिवसेनेचे महानगरप्रमुख शरद तायडे, मनपा विरोधी पक्षनेते सुनील महाजन हे देखील तत्काळ धावून आले होते. तसेच साहित्या यांना रुग्णालयात दाखल केले होते. आता काही दिवसांपासून शिवसेनेचे सुत्र देखील संपर्क कार्यालयातूनच हालत आहेत.