विद्यार्थ्यांमध्ये फायटरने हाणामारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2019 12:26 PM2019-03-14T12:26:10+5:302019-03-14T12:26:59+5:30
जळगाव येथे तंत्रनिकेतनसमोर वाद
जळगाव : शासकीय औद्योगिक संस्था अर्थात आयटीआयच्या विद्यार्थ्यांमध्ये बुधवारी दुपारी एक वाजता महामार्गावरील तंत्र निकेतन समोर जोरदार हाणामारी झाली. यात एका गटाने फायटरचा वापर केला. भररस्त्यावर झालेला हा वाद नंतर रामानंद नगर पोलिसात पोहचला. तेथे गुन्हा दाखल करु नये यासाठी एका माजी नगरसेवकाने पुढाकार घेतला.
याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, आयटीआयमध्ये शिक्षण घेत असलेल्या एका विद्यार्थ्याने दुसऱ्या विद्यार्थ्यांना शिवराळ भाषा वापरली असता त्यावर एका विद्यार्थ्याने कशाला शिवीगाळ करतो, असे म्हटले असता तिघांना या विद्यार्थ्याला बदडून काढले. त्यात एका विद्यार्थ्याजवळ फायटर होते, त्यामुळे या मारहाणीत हा विद्यार्थी जखमी झाला. ज्या विद्यार्थ्याला मारहाण केली तो जलसंधारण विभागातील कर्मचाऱ्याचा मुलगा आहे तर अन्य तिघं जण साधारणच आहेत. दोन्ही गटातील विद्यार्थी तक्रार देण्यासाटी रामानंद नगर पोलिसात गेले होते.
गुन्हा दाखल होत असल्याची कुणकुण लागताच एका माजी नगरसवेकाने रामानंद नगर पोलीस स्टेशन गाठून मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. दोन्ही गटातील विद्यार्थ्यांच्या पालकांना बोलावण्यात आले. त्यानंतर शालेय जीवनाचा विचार करुन गुन्हा दाखल न करता समज देऊन प्रकरण मिटविण्यात आले.
विद्यार्थ्यांमधील गॅँगवार घातक
गेल्या वर्षभरापासून विद्यार्थ्यांमध्येच मोठ्या प्रमाणात टोळी युध्द बघायला मिळत आहे. आयएमआर महाविद्यालयाचे मैदान असो कि शहरातील इतर महाविद्यालये येथे विद्यार्थ्यांचे गट तयार होऊन मोठ्या प्रमाणावर हाणामारी व दहशत माजविण्याच्या घटना घडल्या आहेत. विशेष म्हणजे या घटनांमध्ये फायटर, लाठ्याकाठ्या, चॉपर या सारख्या शस्त्रांचा वापर होऊ लागला आहे. उद्याचे भविष्य ज्यांच्यावर अवलंबून आहे, त्यांच्या हातात पुस्तकांऐवजी शस्त्र येऊ लागल्याने हा प्रकार घातक ठरु लागला आहे.