प्रेमप्रकरणावरून उंटावद येथे हाणामारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2020 03:49 PM2020-05-11T15:49:00+5:302020-05-11T15:51:58+5:30
प्रेमप्रकरणावरून उंटावद येथे दोन गटात वाद वाढून हाणामारी झाली.
यावल, जि.जळगाव : तरुणीशी प्रेमसंबंध असल्याचे गावात सांगून मुलीची बदनामी होत असल्याने मुलीचे वडील मुलाच्या वडिलांना समजावयास गेले. तेव्हा दोन गटात वाद वाढून हाणामारी झाली. याप्रकरणी दोन्ही गटांकडून परस्परविरोधी फिर्यादी दाखल करण्यात आल्या आहेत. एका गटाकडील आठ जणांविरुद्ध, तर दुसऱ्या गटातील १५ जणांविरुद्ध मारहाणीसह दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या हाणामारीत एका महिलेस दोन जण जखमी झाले. रविवारी सायंकाळी उंटावद, ता.यावल येथे ही घटना घडली.
सूत्रांनुसार, तालुक्यातील उंटावद येथील समीर मेहेरबान तडवी हा गावातील तरूणीशी प्रेमसंबंध असल्याचे सांगून तरूणीच्या कुटुंबियांचंी बदनामी करीत होता. यावरून या तरूणीचे वडील समीरच्या घरी गेले. हा आपल्या मुलीची बदनामी करतो, असे त्याच्या वडिलांना सांगितले. त्याला समजावून सांगा, असे ते म्हणाले. तेव्हा तुमच्या मुलीलाच सांभाळा, आम्हाला कशाला दोष देता, असे सांगून मुलीच्या वडिलांंना शिवीगाळ केली. तसेच संशयित आरोपी समीर तडवी, रोशन मेहेरबान तडवी, गुलाब सायबू तडवी, कुर्बान झिपरू तडवी, छब्बू बाबू तडवी मेहेरबान झिपरू तडवी यांच्यासह दोन महिलांनी तरूणीच्या भावास व काकूस मारहाण केली. त्यातील रोषण तडवी याने हातातील फायटरने मारहाण केली. त्यात दोघे जखमी झाले.
तर परस्परविरोधी फिर्याद रोषण तडवी याने दिली. त्यात म्हटले आहे की, माझा भाऊ समीर याने तरूणीशी प्रेमसंबध ठेवू नये या कारणावरून गावातील सुभाष पाटील, अरूण पाटील, नीलेश पाटील याच्यासह १५ जणांंनी घरी येवून दगडविटा मारून आई-वडील यांना मारहाण केली.
दोन्ही गटाकडील २३ जणांविरूध्द येथील पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पो. नि. अरूण धनवडे, हे. कॉ. संजय तायडे, सुनील तायडे, विकास सोनवणे तपास करीत आहेत.