शाळेची संरक्षक भिंत कोसळून मुलाचा मृत्यू , कुटूंबियांचा एकच आक्रोश
By सागर दुबे | Published: March 31, 2023 07:48 PM2023-03-31T19:48:57+5:302023-03-31T19:49:04+5:30
संबंधितांवर गुन्हा दाखल करा अन्यथा मृतदेह ताब्यात घेणार नाही ; कुटूंबियांसह ग्रामस्थांचा पवित्रा
जळगाव : नशिराबाद येथील सुनसगाव रस्त्यावरील जिल्हा परिषद शाळेची संरक्षक भिंत कोसळून झालेल्या दुर्घटनेत मोहित योगेश नारखेडे (१३, रा.नशिराबाद) या मुलाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शनिवारी सकाळी ११.३० वाजेच्या सुमारास घडली. दुपारी मृतदेह जिल्हा रूग्णालयात आणल्यानंतर कुटूंबियांसह ग्रामस्थांनी जोपर्यंत संबंधित ठेकेदाराविरूध्द गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा पवित्रा घेतला होता. त्यामुळे गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.
योगेश नारखेडे हे नशिराबाद येथे पत्नी निर्मलाबाई, मोठा मुलगा केतन व लहान मुलगा मोहित यांच्यासह वास्तव्यास आहेत. नशिराबाद रस्त्यावरील एका सिमेंट कंपनीमध्ये चालक म्हणून कामाला आहेत. लहान मुलगा मोहित हा नशिराबाद येथील न्य इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये इयत्ता सातवीला शिक्षण घेत होता. सद्या शाळेला सुट्टया असल्यामुळे तो घरी होता. शुक्रवारी सकाळी ११.३० वाजेच्या सुमारास तो सुनसगाव रस्त्यावरील जिल्हा परिषद शाळेच्या भिंतीजवळ मित्रासांबत खेळत होता. अचानक शाळेच्या संरक्षक भिंत त्याच्या अंगावर कोसळली. त्यात त्याच्या डोक्यासह चेहरा आणि छातीला गंभीर दुखापत झाली. ही घटना ग्रामस्थांनी कळाल्यानंतर त्यांनी तत्काळ त्यास जिल्हा रूग्णालयात उपचारार्थ हलविले. डॉक्टरांनी तत्काळ त्याच्यावर उपचार करण्यास सुरूवात केली. पण, सीटीस्कॅन दरम्यान त्याचा मृत्यू झाला. यावेळी कुटूंबियांनी एकच आक्रोश केला.
दीड वर्षापासून संरक्षक भिंतीचे काम बंद...
नशिराबाद ग्रामपंचायतीच्या पंधराव्या वित्त आयोग्याच्या निधीतून जिल्हा परिषद शाळेच्या संरक्षक भिंतीचे काम मंजूर झाले होते. त्यानुसार संरक्षक भिंतीचे काम सुरू झाले होते. पण, सन २०२१ मध्ये जून्य महिन्यात ग्रामपंचायत ही नगरपालिका घोषित झाली. त्यामुळे एमआरईजीएसची कामे ही शहरी भागात होत नसल्यामुळे संरक्षक भिंतीचे काम थांबले आणि दीड वर्ष उलटूनही संरक्षक भिंतीचे काम आजही बंदच आहे. त्यामुळे संबंधित ठेकेदार व प्रशासनाच्या हलगर्जी पणामुळे मुलाचा मृत्यू झाला आहे, असा आरोप करून संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी मयत मुलाच्या वडीलांनी केली. त्यानंतर कुटूंबियांसह ग्रामस्थांनी जोपर्यंत गुन्हा दाखल होणार नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा पवित्रा घेतला होता. त्यामुळे गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. रूग्णालयात पोलिसही दाखल झाले होते.