नंदुरबार जिल्हा उपकारागृहातून जामिनावर सुटलेल्या आरोपींचे स्वागत करणाऱ्यांविरूध्द गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2020 06:55 PM2020-07-24T18:55:32+5:302020-07-24T18:57:14+5:30
नंदुरबार जिल्हा उपकारागृहातून जामिनावर सुटलेल्या आरोपींचे स्वागत करणाऱ्यांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे
रावेर, जि.जळगाव : शहरात २२ मार्च रोजी उसळलेल्या जातीय दंगलीत संभाजीनगर भागात घरात निर्धास्त झोपलेल्या निरपराध प्रौढाची निर्घृण हत्या करून सात वाहनांची व विधवा महिलेच्या घराची जाळपोळ करून तथा एक होमगार्ड तथा रसलपूर येथील एका युवकाला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी रावेर पोलिसात दाखल सहा गुन्ह्यातील दोन आरोपींची जामिनावर सुटका झाली म्हणून त्यांच्या स्वागतासाठी सोशल डिस्टन्सिंगचे पालन करता जमावबंदीचे उल्लंघन करून गर्दी जमा करत जातीय भावना दुखावतील अशा घोषणाबाजी तथा व्हॉटसअॅपवर फोटो प्रसार करीत द्वेषभावना तथा शत्रुत्व निर्माण होईल असे कृत्य केले म्हणून एका गटाच्या नऊ, तर दुसºया गटातील २३ जणांविरुद्ध सावदा व रावेर पोलिसात वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पोलीस सूत्रांनुसार, रावेर शहरातील शिवाजी चौक व मन्यारवाडा भागात २२ मार्च रोजी पुकारलेल्या जनता कर्फ्युत प्रार्थनास्थळासमोर रस्त्यावर उतरून गर्दी का जमा केली असे हटकल्याच्या कारणावरून उसळलेल्या जातीय व हिंसक दंगल तथा जाळपोळप्रकरणी रावेर पोलिसात दाखल केलेल्या सहा गुन्ह्यात १५२ आरोपींना अटक करण्यात आली होती.
दरम्यान, या गुन्ह्यातील आरोपी शेख कालू शेख नलरा याची १ जुलै रोजी नंदुरबार जिल्हा उपकारागृहातून जामिनावर सुटका झाली. ते घरी येत असताना, सावदा शहराबाहेर सोनाली कोल्ड्रिंक्सजवळ शकीलभाई स्प्रिंगवाला यांच्या गॅरेजजवळ त्याचा सत्कार केला. त्या स्वागत समारंभाचे फोटो व्हॉटस्अॅपवर प्रसारीत करून द्वेषभावना तथा शत्रुत्व निर्माण केले, सोशल डिस्टन्सिंगचे पालन न करता जमावबंदीचे उल्लंघन करून शांतताभंग केला व साथरोगाचा फैलाव करण्यासाठी हयगयीचे कृत्य केले. म्हणून आरोपी शेख कालू शेख नुरा, गयासोद्दीन काझी, नगरसेवक आसीफ मोहंमददारा मोहंमद, शेख युसुफ शेख गुलाम मोहम्मद, आरीफ शेख युनूस (सर्व रा.रावेर) हसनुल्लाखान शफी उल्लाखान (रा.वाघोदा) शेख सैद शेख रफिक बागवान, शकील शेख अब्दुल रऊफ, फिरोजखान अफ्तारखान उर्फ लेफ्टी (रा.सावदा) अशा नऊ जणांविरुद्ध सावदा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सावदा पोलीस ठाण्याचे हे.कॉ. महेमूद शहा पुढील तपास करीत आहेत.
दरम्यान, दंगलीच्या तीन गुन्ह्यातील आरोपी नामे मधू पहेलवान उर्फ मधुकर रामभाऊ शिंदे रा.शिवाजी चौक याची नंदुरबार उपजिल्हा कारागृहातून १४ जुलै रोजी जामिनावर सुटका झाली. त्यांच्या स्वागतासाठी शहरातील शिवाजी चौक व संत तुकाराम महाराज मंदिर तथा छत्रपती शिवाजी महाराज पुतळा येथे सोशल डिस्टन्सिंगचे पालन न करता व साथरोग संसर्ग पसरविण्याची हयगई करून तथा जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केले व घोषणाबाजी करीत शांतताभंग करण्याचा प्रयत्न केला. शत्रुत्व तथा द्वेषभावना निर्माण केला म्हणून आरोपी दीपक एकनाथ शिंदे, जयेश मोतीलाल शिंदे, दीपक संतोष महाजन, गोकुळ सुधाकर शिंदे, गणेश उर्फ नरेंद्र जनार्दन शिंदे, राजेश सुधाकर शिंदे, सुनील उखर्डू गायकवाड, आकाश अशोक शिंदे, सचिन दत्तात्रय शिंदे, भावलाल सोनू शिंदे आदी २४ जणांविरुद्ध रावेर पोलिसात गुन्हा दाखल दाखल झाला आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक शीतलकुमार नाईक करीत आहेत.
जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.पंजाबाराव उगल,े अपर पोलीस अधीक्षक भाग्यश्री नवटके, फैजपूर पोलीस उपअधीक्षक नरेंद्र पिंगळे, पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे यांच्या मार्गदर्शनानुसार करण्यात आली असून आणखी काही सराईत आरोपीवर मोक्का कायद्यानुसार कारवाईची प्रक्रिया सुरू झाली आहे. यापुढे रावेर, रसलपुरसह पोलीस स्टेशन हद्दीतील शांतता बिघडविण्याचा प्रयत्न करणाऱ्यांविरूध्द सक्त कारवाई करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.