महिलेशी अश्लिल वर्तन करणाऱ्या पोलिसाविरुध्द विनयभंगाचा गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2018 09:15 PM2018-08-25T21:15:02+5:302018-08-25T21:16:57+5:30
जळगाव : हरिविठ्ठल नगरात २८ वर्षीय महिलेशी तिच्याच घरात जाऊन अश्लिल वर्तन करणाºया योगेश वाघ या पोलिसाविरुध्द रामानंद नगर पोलीस स्टेशनलाच शनिवारी विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला. घरात कोणी नसताना वाघ याने बुधवारी दुपारी दोन वाजता हरिविठ्ठल नगरात या महिलेशी अश्लिल वर्तन केले होते विशेष म्हणजे शासकीय गणवेशातच त्याने हे कृत्य केले होते.
लहान मुलांच्या भांडणावरुन पीडित महिला व तिच्या पतीविरुध्द शुक्रवारी रामानंद नगर पोलीस स्टेशनला अदखलपात्र गुन्ह्याची नोंद झाली होती. हे प्रकरण वाघ याच्याकडे चौकशीसाठी सोपविण्यात आले होते. वाघ याला बुधवारी पीडित महिलेचे पती महामार्गावर भेटले होते. तेथून ते पाळधी येथे गेले होते. ही संधी साधून वाघ याने सही घेण्याच्या बहाण्याने पीडित महिलेचे घर गाठून तिच्याशी अश्लिल वर्तन केले होते.
दोन दिवसात कोणतीच कारवाई न झाल्याने पीडितेसह या सर्वांनी शनिवारी पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांची भेट घेऊन झाल्या प्रकाराची माहिती दिली. शिंदे यांनी रामानंद नगर पोलिसांशी संपर्क साधून तत्काळ गुन्हा दाखल करण्याचे आदेश देऊन या कर्मचाºयाचा अहवाल सादर करण्याचे आदेश दिले.