प्राध्यापकांची रिक्त पदे तत्काळ भरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2021 04:12 AM2021-07-20T04:12:57+5:302021-07-20T04:12:57+5:30
जळगाव : राज्यातील अनुदानित महाविद्यालये व विद्यापीठातील प्राध्यापकांच्या सर्व रिक्त पदे तत्काळ भरण्यात यावी, यासह इतर मागण्यांसाठी बहुजन एम्प्लॉईज ...
जळगाव : राज्यातील अनुदानित महाविद्यालये व विद्यापीठातील प्राध्यापकांच्या सर्व रिक्त पदे तत्काळ भरण्यात यावी, यासह इतर मागण्यांसाठी बहुजन एम्प्लॉईज फेडरेशन ऑफ इंडिया संलग्न बहुजन कर्मचारी संघटनेच्यावतीने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले आहे.
महाराष्ट्र राज्यात उच्चशिक्षित बेरोजगारांची संख्या वाढली असून मागील दहा वर्षात महाविद्यालयीन प्राध्यापकांची भरती प्रक्रिया पूर्णपणे झालेली नाही. महाविद्यालयांमध्ये सीएचबी किंवा कंत्राटी स्वरूपावर अत्यल्प उच्चशिक्षित पात्रताधारक शिक्षकांना राबविले जात आहे. आणि त्यात कोरोना महामारीच्या निर्बंधामुळे उच्चशिक्षितांवर उपासमारीची वेळ आली आहे. तसेच काही उच्च शिक्षितांनी आत्महत्यासुध्दा केल्या आहेत. त्यामुळे शासनाने त्वरित प्राध्यापक भरती करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. दरम्यान, एक दिवसीय धरणे आंदोलनात संघटनेचे राज्याध्यक्ष भास्करराव हिवाळे, राज्य सचिव विरूदेव व्हडकर, प्रकाश पाटील, बालाजी राऊत, जगदीश सोनवणे, नीलेश चौधरी, अरुण नेरकर, शिवराम पाटील आदींचा सहभाग होता.
अशा आहेत मागण्या
- प्राध्यापक भरतीसाठी प्रचलित आरक्षण धोरण कायम ठेवण्यात यावे.
- अनुदानित महाविद्यालये व विद्यापीठातील शिक्षकीय संवर्गातील राखीव प्रवर्गातील अनुशेष तत्काळ भरावा.
- तासिका तत्त्व धोरण कायमस्वरूपी बंद करण्यात यावे.
- तासिका तत्वावरील कामाचा अनुभव कायमस्वरूपी सेवेत समाविष्ट झाल्यानंतर ग्राह्य धरावा.
- ७ मे रोजी काढलेला काळा जी.आर. रद्द व्हावा.
- जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी.
- राज्यातील १५ विद्यापीठांमध्ये असलेल्या कर्मचारी, अधिकारी यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यात यावा.
- सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना निवृत्ती वेतन शंभर टक्के व त्यांचे सर्व अनुदान तत्काळ मिळावे.
- प्राथमिक शिक्षकांना त्यांच्या चटोपाध्याय वेतन श्रेणीप्रमाणे सर्व वेतनश्रेण्या लागू करण्यात याव्यात.