मतदान आकडेवारीत घोळामुळे भडगावला एका केंद्रावर २९ रोजी फेरमतदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2019 12:15 PM2019-04-27T12:15:39+5:302019-04-27T12:16:05+5:30
जळगाव : जळगाव लोकसभा मतदार संघातील भडगाव येथील मतदान केंद्र क्रमांक १०७वर मॉक पोल व्यतिरिक्त तीन मते अधिक आढळून ...
जळगाव : जळगाव लोकसभा मतदार संघातील भडगाव येथील मतदान केंद्र क्रमांक १०७वर मॉक पोल व्यतिरिक्त तीन मते अधिक आढळून आल्याने या केंद्रावर आता २९ रोजी पुनर्मतदान घेण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला आहे. दरम्यान, या प्रकरणी गुरुवारी जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी मतदान केंद्राध्यक्षांसह दोघांना निलंबित केले होते. या निवडणुकीतील निलंबनाच्या पहिल्याच घटनेनंतर पुनर्मतनाचीही ही पहिलीच घटना आहे.
२३ एप्रिल रोजी मतदानावेळी जळगाव लोकसभा मतदार संघात भडगाव येथील मतदान केंद्र क्र.१०७ वर मतदान केंद्रावरील अधिकारी मॉकपोलचे (अभिरूप मतदान) ५० मत डिलीट करायलाच विसरून गेल्याचा प्रकार नंतर लक्षात आला होता. मात्र तपासणीत या ५० मतांव्यतिरिक्त आणखी ३ अतिरिक्त मते आढळून आले होते. केंद्राध्यक्ष उद्धवराव पाटील व मतदान अधिकारी क्र.३ सुनीता देवरे यांनी मतदानावेळी मॉक पोल केल्यानंतर कंट्रोल युनिटमधील डाटा क्लिअर केला नाही. त्यामुळे मॉकपोलचे (अभिरूप मतदान) ५० मत मशिनमध्ये तसेच राहून त्यापुढे मतदान सुरू झाले. मात्र मतदान केंद्राध्यक्ष यांची दैनंदिनी व नोंदवलेल्या मतांचा हिशोब (नमुना १७-क) व मतदार नोंदवही (नमुना १७-अ) यांच्या तपासणीत मतदार नोंदवहीत ५५५ मतदारांची नोंद आहे. तसेच मतांच्या हिशेबातही ५५५ मते नोंदविल्याचे नमूद आहे. मात्र क्षेत्रीय अधिकारी यांच्या अहवालानुसार मतदान यंत्रात झालेले मतदान ६०८ असल्याने ५३ मतांचा फरक आढळून आला. त्यापैकी मॉकपोलच्या ५० मतांव्यतिरिक्त ३ मतांचा फरक आढळून आल्याने खळबळ उडाली होती. मतदार नोंदवहीत नोंद न घेताच ३ जास्तीची मते मतदान यंत्रात नोंदविल्याचे स्पष्ट झाले. या प्रकाराची जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी गांभीर्याने दखल घेऊन निवडणूक आयोगाकडे याबाबत अहवाल पाठविला होता.
राज्य निवडणूक आयोगाने हा अहवाल केंद्रीय निवडणूक आयोगाकडे पाठविला. त्यानुसार शुक्रवारी केंद्रीय निवडणूक आयोगाने या मतदान केंद्रावर पुनर्मतदान घेण्याचा निर्णय घेतला व तसे पत्र राज्याच्या मुख्य निवडणूक आयोगाला पाठविले असून जिल्हा प्रशासनालाही तसे सूचित करण्यात आले आहे. त्यानुसार आता या मतदान केंद्रावर २९ एप्रिल रोजी सकाळी ७ ते संध्याकाळी ६ या वेळेत पुन्हा मतदान होणार आहे. यासाठी सर्व नवीन मतदान अधिकारी, कर्मचाऱ्यांची (पोलिंग पार्टी) नियुक्ती करावी, असेही नमूद केले आहे.
दरम्यान, या प्रकरणी मतदान केंद्राध्यक्ष उद्धवराव पाटील व मतदान केंद्र अधिकारी क्र.३ सुनीता देवरे यांना लोकप्रतिनिधित्व अधिनियम १९५१चे कलम २७, २८, व २८-अ अन्वये कायदेशीर जबाबदारी पार पाडलेली नसून अक्षम्य हलगर्जीपणा केल्याचा ठपका ठेवत त्यांना निलंबित करण्यात आले होते.