माहेरात फुलवली ‘छाया’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2019 12:12 AM2019-03-08T00:12:35+5:302019-03-08T00:12:51+5:30
छाया सतीश पाटील यांनी तयार केले व्हिलेज गार्डन
धरणगाव : ‘बालपणीच्या आठवणी, त्या स्वप्नात मी आजही रमते....! माहेरची ओढ मात्र मनात काहूर माजवते !! या काव्यपंक्तीप्रमाणे सासरवाशीण असलेल्या प्रत्येक स्त्रीला माहेरची ओढ लागल्या शिवाय राहत नाही. अशाच एका सामाजिक कार्यकर्त्या असलेल्या महिलेने आपल्या माहेरात ‘व्हिलेज गार्डन’ फुलवून माहेरच्या लोकांना छाया दिली आहे. त्यांच्या या कामामुळे चमगावची कायापालट झाल्याचे चित्र पहायला मिळते.
छाया सतीश पाटील असे या महिलेचे नाव असून त्या एरंडोल महाविद्यालयाचे माजी प्राचार्य ए.एस.पाटील यांच्या सुकन्या आहेत. वडिलांच्या संस्काराने व मुंबई एमआयडीसीचे सोशल अधिकारी असलेले पती सतीश पाटील यांच्या सहकार्याने त्यांनी ठाणे (मुंबई) येथे ‘ग्रीन अर्थ लव्हर्स आॅफ नेचर’ या सेवाभावी सामाजिक संस्थेची स्थापना करून मुंबई परिसरात पर्यावरण संवर्धनाचे, वृक्ष लागवडीचे काम केले आहे.
गेल्या सात-आठ वर्षापूर्वी त्या माहेर असलेल्या चमगाव ता.धरणगाव येथे आल्या असताना बालपणीच्या आपल्या आठवणींना उजाळा मिळाला. त्यांनी गावात आपल्या संस्थेतर्फे विकास करण्याचे ठरवले व आपले माहेर असलेल्या चमगावला छानसे ‘व्हिलेज गार्डन’ तयार करून बाग फुलवली. बागेत सिमेंट बाक बसविले. वृक्षारोपण करून ग्रामस्थांकडे त्या वृक्षाची संवर्धनाची जबाबदारी सोपवली. एवढच नव्हे तर गावातील तरडे, दहिदुले, वाकटुकी, अंजनविहिरे या गावांच्या हुशार बालगोपाल विद्यार्थ्यांसाठी दप्तर, वह्या, पुस्तकांचे वाटप, आरोग्य शिबिरे भरून आपल्या माहेरला फुलविण्याचे काम करून आपला वेगळा ठसा उमटविला.
हे सामाजिक कार्याचे बाळकडू मला माझे वडील प्राचार्य कै.ए.एस.पाटील यांच्याकडून तर प्रेरणा पती सतीश पाटील व मावस बहिण माजी आरोग्य मंत्री शोभा बच्छाव यांच्याकडून मिळाल्याचे त्या अभिमानाने सांगतात. मला गावातील ज्येष्ठ मंडळी ईश्वर पाटील, डॉ.नितीन पाटील, अशोक पाटील, रमेश पाटील, रंगराव पाटील, गजानन पाटील, पंजाबराव सावंत, संजय शिरसाठ, शिवाजी सावंत, संदीप सावंत, गुलाल पाटील, ओंकार पाटील व सर्व ग्रामस्थांचे सहकार्य लाभल्याचे त्या सांगतात.
चमगावात ग्रामस्थांसाठी बागबगीचा फुलवून वृक्ष लागवड करून गावात सुविचार लिहून, गार्डनचे प्रवेशद्वार, संरक्षक भिंत बांधून व गावाचे रुप पालटवले याचा आनंद असून आजही गावात नवीन काही करण्याचा माझा मानस असल्याचे छाया पाटील यांंनी सांगितले. शहरात काम करण्यापेक्षा आपल्या छोट्याशा गावात काही तरी केल्याचे समाधान आहे. त्यांच्या या कार्याने माहेरची मंडळी समाधानी आहेत.