आजपासून ' पॉलिटेक्निक' च्या अंतिम वर्षाच्या परीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 6, 2020 09:36 AM2020-10-06T09:36:02+5:302020-10-06T09:37:27+5:30
जळगाव : खाजगी व शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयातील डिप्लोमा अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षाच्या ऑनलाईन लेखी परीक्षांना आजपासून सुरुवात होत आहे. ...
जळगाव : खाजगी व शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयातील डिप्लोमा अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षाच्या ऑनलाईन लेखी परीक्षांना आजपासून सुरुवात होत आहे. विशेष म्हणजे परीक्षा काळात विद्यार्थ्यांना कुठलीही अडचण येऊ नये म्हणून परीक्षेचा मॉक टेस्टद्वारे आधीच सराव करून घेण्यात आला आहे. मात्र जरी विद्यार्थ्यांना ऑनलाईन पेपर देत असताना अडचणी उद्भवल्यास, त्याबाबत लागलीच महाविद्यालय किंवा आरबीटीईच्या टोल फ्री क्रमांकावर अडचणीबाबत तक्रार नोंदवू शकता येणार आहे.
महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळाने काही दिवसांपूर्वी अंतिम वर्षाच्या परीक्षांसंदर्भात सूचना तसेच वेळापत्रक जाहीर केले होते. जळगाव जिल्हयातून सुमारे तीन ते चार हजाराच्यावर विद़यार्थी डिप्लोमाच्या अंतिम वर्षाच्या अंतिम सत्राची परीक्षा देणार आहेत. ही परीक्षाही बहुपर्यायी असणार आहे. नुकतीच शहरातील शासकीय तंत्रनिकेतन महाविद़यालयातर्फे गुगल मिट व झुम ॲपद्वारे विद़यार्थ्यांची ऑनलाईन तोंडी घेण्यात आली. आता मंगळवारपासून रेग्युलर अंतिम सत्राच्या विद़यार्थ्यांची परीक्षा होणार आहे. त्यानंरतर ३१ ऑक्टोंबरला निकाल जाहीर केला जाईल.
४० पैकी ३० प्रश्न सोडविणे आवश्यक
डिप्लोमा अंतिम सत्राची लेखी परीक्षा ही एमसीक्यू वापरून ऑनलाईन पध्दतीने मंडळस्तरावर होणार आहे. परीक्षा विद़यार्थी स्मार्ट मोबाईल, लॅपटॉप, टॅबलेट, डेस्कटॉप इत्यादींचा वापर करून ज्या ठिकाणी आहेत, तेथून देवू शकतील. परीक्षेत विद़यार्थ्यांना ४० पैकी ३० प्रश्न सोडविणे आवश्यक असेल. प्रत्येक प्रश्न एक गुणांचा असणार असून परीक्षेसाठी १ तासाचा कालावधी दिला जाणार आहे. बॅकलॉक विषयांची परीक्षा ही संस्थास्तरावर ऑनलाईन पध्दतीन होणार आहे.
विभागीय समन्वयकाकडे नोंदविता येणार तक्रार
अंतिम सत्राची परीक्षा ही सुरळीत पार पडण्यासाठी समिती गठीत करण्याच्या सूचना मंडळकडून करण्यात आली आहे. त्याचबरोबर परीक्षेसाठी मुख्य समन्वय व विभागीय समन्वयक देखील नेमण्यात आले आहे. डिप्लोमा अंतिम वर्षाच्या परीक्षा संपूर्ण ऑनलाइन पद्धतीने घेण्यात येणार असल्यामुळे विद्यार्थ्यांना लॉगिन आणि पासवर्ड उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. मागील आठवड्यात विद्यार्थ्यांनी मॉक टेस्टद्वारे परीक्षा कशी होईल, याबाबत जाणून घेतला आहे. दुसरीकडे ऑनलाइन परीक्षा देत असताना तांत्रिक अडचणी उद्भवल्यास संबंधित विभागीय समन्वयकाकडे तक्रार करू शकणार आहे. त्यांनंतर विद्यार्थ्यांच्या अडचणी सोडवण्यात येतील.
दोन सत्रात होणार परीक्षा
डिप्लोमा अंतिम वर्षाची परीक्षा ही सकाळ व दुपारच्या दोन सत्रांमध्ये होईल. सकाळी नऊ ते दुपारी एक तर दुपारी दोन ते सायंकाळी सहा या कालावधीत ही परीक्षा विद्यार्थ्यांना देता येईल. विद्यार्थ्याने लॉगिन करतातच परीक्षेचा एक तासाचा कालावधी त्यावेळेपासून सुरू होईल अशी माहिती तंत्रनिकेतन महाविद्यालयातर्फे देण्यात आली आहे.