अखेर ॲड. प्रवीण चव्हाण पोलिसांच्या जाळ्यात! जळगाव पोलिसांकडून अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: February 26, 2023 11:17 PM2023-02-26T23:17:13+5:302023-02-26T23:17:59+5:30
‘हजेरी’साठी आले नि कोठडीत गेले...
लोकमत न्यूज नेटवर्क, जळगाव : खंडणीच्या गुन्ह्यात जामीन मिळाल्यानंतर न्यायालयीन आदेशानुसार तत्कालीन विशेष सरकारी वकील ॲड. प्रवीण चव्हाण चाळीसगाव येथे विशेष तपास पथकासमोर रविवारी हजर झाले. मात्र, अन्य एका गुन्ह्यात न्यायालयाचे कुठलेही आदेश नसल्याचे स्पष्ट होताच जळगाव शहर पोलिसांनी रविवारी संध्याकाळी ॲड. चव्हाण यांना ताब्यात घेत रात्री उशीरा अटकेची कारवाई केली.
नीलेश रणजीत भोईटे (जळगाव) यांच्या फिर्यादीवरून विजय भास्कर पाटील व किरणकुमार साळुंखे यांच्याविरुद्ध दि.१० ऑक्टोबर २०२२ रोजी गुन्हा दाखल होता. या गुन्ह्याच्या चौकशीत साक्षीदार व पुण्यातील व्यावसायिक तेजस मोरे यांचा जबाब नोंदविण्यात आला होता. मोरे यांनी कट कारस्थान रचण्यासंदर्भात झालेल्या संवादाची एक ऑडिओ क्लीप सादर केली होती. त्यानंतर ॲड. प्रवीण चव्हाण यांना सहआरोपी करण्यात आले होते. ॲड. प्रवीण चव्हाणला जळगाव न्यायालयाने खंडणीच्या अन्य एका गुन्ह्यात जामीन मंजूर केला आहे. जामीन मंजूर करताना या गुन्ह्याचा तपास करणाऱ्या विशेष पथकासमोर हजेरी लावण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते. त्यानुसार ॲड. चव्हाण रविवारी सकाळी चाळीसगाव येथे हजेरी लावली. मात्र, ॲड. चव्हाण यांच्याविरोधात जळगाव शहर पोलिसातही अन्य एक गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यासंदर्भात न्यायालयाचे कुठलेही आदेश नसल्याने हजेरीसाठी आलेल्या ॲड. चव्हाण यांना ताब्यात घेत अटक करण्यात आली.
दरम्यान, आरोपी ॲड.चव्हाण यांना सोमवारी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"