अखेर चोसाका बारामती ॲग्रोकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2021 04:19 AM2021-09-21T04:19:59+5:302021-09-21T04:19:59+5:30
चोपडा : चोपडा येथील सहकारी साखर कारखाना अर्थात चोसाका आता बारामती ॲग्रोकडे भाडेतत्त्वाने दिला जाणार आहे. या पोटी दरवर्षी ...
चोपडा : चोपडा येथील सहकारी साखर कारखाना अर्थात चोसाका आता बारामती ॲग्रोकडे भाडेतत्त्वाने दिला जाणार आहे. या पोटी दरवर्षी चोसाकाला ५० लाख रुपये भाडे दिले जाणार आहे. याबाबतची सर्व प्रक्रिया २० रोजी पूर्ण करण्यात आली.
चोसाका भाड्याने देण्यासाठी निविदा मागविण्यात आल्या होत्या. २० रोजी पुणे येथील साखर आयुक्तालयात उपस्थितीत टेंडर उघडण्यात आले. तर त्यात उसाच्या प्रति टनाला सर्वात जास्त भाव बारामती अग्रोने दिला आहे. चेअरमन अतुल ठाकरे यांनी सांगितले की, भाडेतत्त्वावर घेण्यासाठी चार कारखान्यानी निविदा भरली होती. त्यात लातूर येथील धारावी साखर कारखान्याने १०५ रुपये, जकराया साखर कारखाना ने १०८ रुपये, सिद्धिकी साखर कारखान्याने ११० रुपये प्रति टन भाव भरला होता. त्यांच्या पेक्षा जास्त भाव बारामती ॲग्रोने प्रतिटन उसाला ११५ रुपये दिला होता.
टेंडर उघडताना साखर कारखान्याचे चेअरमन अतुल ठाकरे, व्हा. चेअरमन शशी देवरे, संचालक सुनील महाजन, गोपाल धनगर, बाळासाहेब ऊर्फ विजय दत्तात्रय पाटील, अनिल पाटील, प्रदीप पाटील, विनोद पाटील आणि प्रभारी कार्यकारी संचालक अकबर पिंजारी, सचिव आधार पाटील, बारामती ॲग्रोचे व्हाईस चेअरमन सुभाष गुळवे उपस्थित होते.
साखर कारखाना सुरू व्हावा यासाठी सर्वपक्षीय नेत्यांमध्ये प्रामुख्याने राष्ट्रवादीचे
नेते अरुणभाई गुजराथी, माजी आमदार कैलास पाटील, जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष ॲड. संदीप
पाटील, घनश्याम अग्रवाल, उद्योजक सुनील जैन, पीपल्स बँकेचे चेअरमन तथा माजी व्हाईस
चेअरमन चंद्रहासभाई गुजराथी, माजी चेअरमन घनश्याम पाटील, प्रवीणभाई गुजराथी यांनी
प्रयत्न केले.
आडसाली ऊस लागवडीवर भर द्यावा
साखर कारखाना याच हंगामात सुरू होणार असल्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी
आडसाली ऊस लागवडीवर जास्त भर द्यावा. उसाचे टनेज व साखरेचा उतारा जास्त येईल, असे चेअरमन यांनी म्हटले आहे.