अखेर काशी एक्स्प्रेसला दिव्यांग बांधवांचा डबा पुन्हा सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 04:19 AM2021-06-09T04:19:25+5:302021-06-09T04:19:25+5:30
जळगाव : काशी एक्सप्रेसमधील दिव्यांग बांधवांसाठी असलेला स्वतंत्र डबा रेल्वे प्रशासनाने गेल्या महिन्यात अचानक बंद केल्यामुळे, दिव्यांग बांधवांची मोठ्या ...
जळगाव : काशी एक्सप्रेसमधील दिव्यांग बांधवांसाठी असलेला स्वतंत्र डबा रेल्वे प्रशासनाने गेल्या महिन्यात अचानक बंद केल्यामुळे, दिव्यांग बांधवांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय होत होती. यामुळे या प्रवाशांना इतर डब्यांमधुन प्रवास करावा लागत होता. याबाबत `लोकमत` ने दिव्यांग बांधवांच्या होत असलेल्या गैरसोयी बद्दल वृत्त प्रकाशित केले होते. या वृत्ताची दखल घेत रेल्वे प्रशासनाने पुन्हा काशी एक्सप्रेस मधुन दिव्यांग बांधवांचा डबा पुन्हा सुरू केला आहे.
रेल्वे प्रशासनातर्फे प्रत्येक प्रवासी रेल्वे गाडीला इंजिनाच्या बाजूला दिव्यांग बांधवांसाठी स्वतंत्र एक डबा लावण्यात येत असतो. या डब्यातून फक्त दिव्यांग बांधवांनाच प्रवासाची मुभा आहे. तर इतर प्रवासी या डब्यातुन प्रवास करतांना आढळून आल्यास, त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्याचे रेल्वे पोलिसांना देण्यात आले आहेत. मात्र, रेल्वे प्रशासनाने एप्रिल महिन्यात कोरोनाचे कारण सांगून गाडी क्रमांक (०५०१७-१८) या काशी एक्स्प्रेसचा दिव्यांग व महिलांसाठी असलेला स्वतंत्र डबा अचानक बंद केला होता. या निर्णयामुळे दिव्यांग बांधवांमधुन रेल्वेच्या या निर्णयावर तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत होती. हा डबा बंद केल्यामुळे दिव्यांग बांधवांना जनरल डब्यातून खाली बसून प्रवास करावा होता. तसेच जर डब्यात गर्दी राहिली तर डब्यात प्रवेश करणेदेखील अवघड होत होते.
इन्फो :
अन् रेल्वे प्रशासनाने पुन्हा सुरू केला डबा
`लोकमत`ने हा डबा बंद केल्यामुळे दिव्यांग बांधवांच्या होत असलेल्या गैरसोयीबाबत वृत्त प्रकाशित करुन, रेल्वे प्रशासनाने लक्ष वेधले होते. तर भुसावळ विभागातील रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनीदेखील याबाबत आपण रेल्वे बोर्डाला याबाबत कळविणार होते. त्यानंतर अखेर रेल्वे प्रशासनाने `लोकमत`च्या वृत्ताची दखल घेऊन अप आणि डाऊनच्या काशी एक्सप्रेसला पुन्हा दिव्यांग बांधवांसाठी असलेल्या स्वतंत्र डबा जोडला आहे.
इन्फो :
रेल्वे प्रशासनाने कोरोना काळात दिव्यांग बांधवांचा डबा बंद केल्याने, दिव्यांग बांधवांचे खुप हेळसांड झाली. त्यांनी मुळात हा डबा बंद करायलाच नको होता. दिव्यांग बांधवांच्या त्रासाबद्दल `लोकमत`ने वृत्त मांडल्यांवर रेल्वे प्रशासनान खऱ्या अर्थाने जागे आले. त्यामुळे `लोकमत`चे दिव्यांग बांधवांच्यावतीने आभार मानतो.
गणेश पाटील, अध्यक्ष, संघर्ष दिव्यांग कल्याण बहुउद्देशिय संस्था, जळगाव.