अखेर दिलासा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2020 01:01 PM2020-02-16T13:01:55+5:302020-02-16T13:02:12+5:30
भाव वाढलेल्या चांदीत घसरण
विजयकुमार सैतवाल
जळगाव : आंतरराष्ट्रीय पातळीवर मागणी वाढल्याने सोन्या-चांदीच्या भावात झालेल्या भाववाढीस अखेर लगाम बसू लागला आहे. यामुळेच चांदीच्या भावात एकाच दिवसात एक हजार रुपयांनी घसरण होऊन ती ४७ हजार रुपये प्रती किलोवरून ४६ हजार रुपये प्रती किलोवर आली. तसेच सोन्याच्या भावात गेल्या काही दिवसांपासून चढ-उतार सुरू असून चे ४०, ८०० ते ४१, १०० या दरम्यान खालीवर होत आहेत
आंतरराष्ट्रीय पातळीवर इराण व अमेरिका यांच्यातील तणावाच्या स्थितीमुळे गेल्या काही दिवसात सोने-चांदीच्या भावात मोठी वाढ होत गेली. मात्र त्यांच्यातील तणाव कमी झाल्यानंतर सोन्या-चांदीचे भाव स्थिर झाले. त्यानंतर आता चीनमध्ये कोरोनो व्हायरसमुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर चांदीची मागणी घटली आहे. सध्या लग्न सराई असली तरी चांदीची मागणी कमी होत आहे. सोबतच औद्योगिक मागणीदेखील कमी झाल्याने मोठ्या व्यापारी व उद्योजकांनी चांदी खरेदीत हात आखडता घेतला आहे. त्यामुळे वरील दोन्ही कारणांनी मागणी कमी होत असल्यानेही चांदीचे भाव कमी होत असल्याचे सांगितले जात आहे.
या सर्वांचा परिणाम होत असल्याने चांदीचे भाव १३ रोजी एकाच दिवसात एक हजार रुपयांनी घसरून ते ४७ हजार रुपये प्रती किलोवरून ४६ हजार रुपये प्रती किलोवर आले आहेत. १४ रोजीदेखील ते ४६ हजार रुपयांवर कायम होते. गेल्या काही दिवसात सोन्याने ४२ हजाराच्या पुढे झेप घेतली होती. मात्र जानेवारी अखेरपासून सोन्याच्या भाववाढीला ब्रेक लागला. तेव्हापासून त्यात २०० ते ३०० रुपये प्रती तोळ््याने चढ-उतार होत आहे. गेल्या आठवड्यात ५ फेब्रुवारी रोजी ४० हजार ८०० रुपयांवर असलेले सोने वाढत जाऊन १० रोजी ४१ हजार १५० रुपये प्रती तोळ््यावर पोहचले. दुसऱ्याच दिवशी ११ रोजी त्यात २५० रुपयांनी घसरण होऊन ते ४० हजार ९०० रुपयांवर आले. १३ रोजी पुन्हा हे भाव ४१ हजारावर तर १४ रोजी ४१ हजार १०० रुपयांवर पोहचले आहे.