पिंपरखेड येथे अखेर पिण्याच्या पाण्याचे टँकर सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2019 07:28 PM2019-03-13T19:28:26+5:302019-03-13T19:30:43+5:30
पिंपरखेड येथे पिण्याच्या पाण्याच्या गंभीर प्रश्न निर्माण झाला होता. प्रशासनाने गांभिर्याने दखल घेत अखेर बुधवारपासून टँकर सुरू केले. टँकरचे पाणी गावविहिरीत ओतले जाईल व नळांद्वारे थेट ग्रामस्थांना पाणीपुरवठा होईल.
पिंपरखेड, ता.भडगाव : चार हजार लोकसंख्येच्या पिंपरखेड येथे पिण्याच्या पाण्याच्या गंभीर प्रश्न निर्माण झाला होता. प्रशासनाने गांभिर्याने दखल घेत अखेर बुधवारपासून टँकर सुरू केले. टँकरचे पाणी गावविहिरीत ओतले जाईल व नळांद्वारे थेट ग्रामस्थांना पाणीपुरवठा होईल. हा प्रश्न ‘लोकमत’ने लावून धरला होता.
पिंपरखेड येथे पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीने तळ गाठला आहे. यामुळे नागरिकांना पाण्यासाठी चांगलीच भटकंती करावी होती. प्रशासनाने पाणी प्रश्न मार्गी लावावा या मागणीसाठी पंचायत समितीचे माजी उपसभापती प्रमोद मधुकर भोसले यांच्यासह ग्रामस्थ पिंपरखेड ग्रामपंचायतीसमोर उपोषणाला बसले होते.
प्रशासनाने वेळीच लक्ष घालून गावासाठी दोन टँकर मंजूर केले. त्याची अंमलबजावणी बुधवारपासून सुरू झाली. ग्रामपंचायतीच्या विहिरीत पाण्याचे टँकर ओतण्याच्या कामासही आजपासूनच सुरुवात झाली. यामुळे ग्रामस्थांची पाण्यासाठी होणारी भटकंती तूर्त थांबणार आहे. तसेच गावातील पाणीपुरवठ्यातही लवकरच सुधारणा होईल. असे असले तरी गावासाठी कायमस्वरुपी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था होण्याची आवश्यकता आहे.
गावातील पाणी प्रश्नाबाबत ‘लोकमत’ने गेल्या आठवड्यात वृत्त दिले होते. त्यातच बेमुदत उपोषणही सुरू झाले. या प्रकाराची प्रशासनाने गंभीर दखल घेत आजपासून टँकर सुरू केले.
‘लोकमत’ने आमच्या प्रश्न प्रशासनासमोर मांडून पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवला. याबद्दल ग्रामस्थांनी ‘लोकमत’चे आभार मानले आहेत.
टँकरमुळे माणसांचे व गुरांचे पिण्याच्या पाण्याचे संकट टळले आहे.
-गजानन नन्नवरे, ग्रामविकास अधिकारी, पिंपरखेड
गावातील नागरिकांनी पाण्याचा जपून व काटकसरीने वापर करावा. पाणी वाया घालू नये.
-विलास पाटील, जिल्हा कार्याध्यक्ष, पोलीस पाटील संघटना
आमच्या गावातील पाण्याची समस्या ‘लोकमत’मुळेच सुटली. लोकांना पाण्याचे मूल्य कळले.
-अॅड.विश्वासराव भोसले, उपसभापती, बाजार समिती,
पाणी जपून वापरले तर पाण्याची समस्या भविष्यात निर्माण होणार नाही. गावातील पाण्याचा गंभीर प्रश्न टँकरमुळे सुटला आहे.
-सुधीर पाटील, माजी चेअरमन, वि.का.संस्था, पिंपरखेड