अखेर सोने सत्तर हजारी, चांदी ७९,२०० रुपये किलोवर; गुरुवारी सोने ५०० रुपयांनी महागले
By विजय.सैतवाल | Published: April 4, 2024 06:53 PM2024-04-04T18:53:49+5:302024-04-04T18:55:37+5:30
गेल्या महिन्यापासून सातत्याने भाववाढ होत असलेल्या सोन्याच्या भावाने मार्च महिन्यात नवनवीन उच्चांक गाठले.
विजयकुमार सैतवाल
जळगाव : गेल्या तीन दिवसांपासून ७० हजार रुपयांच्या दिशेने जात असलेल्या सोन्याच्या भावाने गुरुवार, ४ एप्रिल रोजी अखेर ७० हजार रुपयांचा पल्ला गाठला. दुसरीकडे चांदीनेदेखील उच्चांकी भाव गाठत ती ७९ हजार २०० रुपये प्रति किलोवर पोहचली.
गेल्या महिन्यापासून सातत्याने भाववाढ होत असलेल्या सोन्याच्या भावाने मार्च महिन्यात नवनवीन उच्चांक गाठले. त्यात १ एप्रिल रोजी त्यात ९०० रुपयांची वाढ होऊन ते ६९ हजार ४०० रुपये प्रति तोळा झाले, तेव्हापासून ७० हजार रुपयांच्या दिशेने जाणाऱ्या सोन्याच्या भावात २ एप्रिल रोजी सकाळी ५५० रुपयांची घसरण झाली, मात्र दुपारी पुन्हा १५० रुपयांची वाढ होऊन सोने ६९ हजार रुपये प्रति तोळा झाले. ३ एप्रिल रोजी पुन्हा ५०० रुपयांची वाढ झाल्याने सोने ६९ हजार रुपये प्रति तोळा झाले. गुरुवार, ४ एप्रिल रोजीदेखील ही वाढ कायम राहत त्यात पुन्हा ५०० रुपयांची भर पडून सोन्याने ऐतिहासिक ७० हजार रुपयांचा पल्ला गाठला.
एकीकडे सोन्याचे भाव वाढत असताना, मध्यंतरी चांदीत किरकोळ चढ-उतार झाला, मात्र मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून चांदीचेही भाव वाढू लागले. त्यामुळे १ एप्रिल रोजी ७६ हजारांवर असलेली चांदी ४ एप्रिल रोजी ७९ हजार २०० रुपये प्रति किलोवर पोहचली. आंतरराष्ट्रीय पातळीवर वाढलेल्या मागणीमुळे सोने-चांदीच्या भावात वाढ होत असल्याचे सुवर्ण व्यावसायिकांचे म्हणणे आहे.
चांदीचा उच्चांक
चांदीचे भाव या पूर्वी ७८ हजार रुपये प्रति किलोवरपर्यंत तीन ते चार वेळा पोहचले, मात्र आता प्रथमच चांदी ७९ हजार रुपयांच्या पुढे गेली आहे. तिचे हे उच्चांकी भाव आहे.