अखेर नालेसफाईचा मुहूर्त गवसला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2021 04:12 AM2021-06-17T04:12:40+5:302021-06-17T04:12:40+5:30
पावसाळा सुरू झाला असूनही नालेसफाईला सुरुवात करण्यात आलेली नव्हती. याकरिता ७० लाख रुपयांची निविदा प्रक्रिया आधीच राबवली होती. मात्र, ...
पावसाळा सुरू झाला असूनही नालेसफाईला सुरुवात करण्यात आलेली नव्हती. याकरिता ७० लाख रुपयांची निविदा प्रक्रिया आधीच राबवली होती. मात्र, जामनेर येथील मोरे इंटरप्राईजेसच्या मक्तेदाराला नालेसफाईसाठी वेळच मिळत नव्हता. ‘लोकमत’ने याबाबत वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर बुधवारी प्रत्यक्षात कामाला सुरुवात झाली आहे. शहरात बलबलकाशी, खाल्लमा यासह १३ मोठे नाले, अनेक मोठ्या गटारी आहेत. ते अक्षरशः घाण कचऱ्यामुळे तुंबलेले आहेत. जोरदार पाऊस पडला तर पावसाचे पाणी घरात शिरते. यामुळे दरवर्षी शहरात नुकसान होत असते.
आरोग्य सभापतींची नजर
आरोग्य सभापती प्रा. दिनेश राठी यांनी नालेसफाई पारदर्शकपणे व्हावी याकरिता नालेसफाई काम करत असताना, ट्रॅक्टरमध्ये घाण कचरा भरताना व डंपिंग ग्राउंडमध्ये घाण टाकताना असे तीन ठिकाणी वेगवेगळे कर्मचारी नियुक्त केले आहेत. याशिवाय ते प्रत्यक्षात नालेसफाई होत असताना त्या ठिकाणी तळ ठोकून होते.
वंचित बहुजन आघाडीचाही पाठपुरावा
शहरातील नालेसफाई रखडल्याने वंचित बहुजन विकास आघाडीने पालिका प्रशासनासह आरोग्य सभापतींकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. नालेसफाईअभावी पावसाळ्यात पंचशील नगरासह नाल्याकाठी राहणाऱ्या नागरिकांच्या घरात पाणी शिरण्याची भीती व्यक्त होत होती. मात्र, कंत्राटदाराने बुधवारी प्रत्यक्षात कामाला सुरुवात केल्याने सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. याप्रसंगी वंचित बहुजन आघाडी जिल्हाध्यक्ष विनोद सोनवणे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून नालेसफाईची सुरुवात केली.
आरोग्य सभापती प्रा. दिनेश राठी, नगरपालिकेचे अधिकारी गौरव अहिरे, वसंत राठोड, प्रदीप पवार व लाला देवकर, भीमराव तायडे, वंचित बहुजन आघाडीचे शहर महासचिव देवदत्त मकासरे, आदी उपस्थित होते.