अखेर लांडोरखोरी उद्यान पासधारकांसाठीही केले खुले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2020 12:45 PM2020-07-02T12:45:59+5:302020-07-02T12:46:20+5:30

‘लोकमत’च्या वृत्तानंतर वनविभागाने घेतली दखल : दैनंदिन येणाऱ्यांना मात्र सध्या प्रवेश नाही

Finally, the Landorkhori Park is open to pass holders as well | अखेर लांडोरखोरी उद्यान पासधारकांसाठीही केले खुले

अखेर लांडोरखोरी उद्यान पासधारकांसाठीही केले खुले

googlenewsNext

जळगाव : मोहाडी रस्त्यालगत असलेल्या लांडोरखोरी उद्यानात सर्वसामान्यांना प्रवेश नाकारत केवळ बड्या अधिकाऱ्यांनाच प्रवेश दिला जात असल्याचे वृत्त ‘लोकमत’ ने बुधवारच्या अंकात प्रकाशित केल्यानंतर बुधवारपासून वनविभागाने उद्यानात वार्षिक व मासिक पासधारकांनाही प्रवेश देण्याचा निर्णय घेतला आहे. ‘लोकमत’ ने हा प्रकार उघडकीस आणल्यानंतर जळगाव वनक्षेत्राचे उपवनसंरक्षक डीगंबर पगार यांनी याबाबतचे आदेश काढले आहेत.
२४ मार्चपासून शासनाने कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून लॉकडाऊन जाहीर केल्यानंतर शहरातील सर्वच धार्मिक ठिकाणे व सार्वजनिक ठिकाणे बंद करण्यात आली होती. यामध्ये लांडोरखोरी उद्यानाचाही समावेश होता. तीन महिन्यांपासून हे उद्यान बंदच होते. तरीही काही वरिष्ठ अधिकारी व काही बड्यांना या उद्यानात प्रवेश मिळत होता. तर नियमित पासधारकांना याठिकाणी प्रवेश दिला जात नव्हता. याबाबत ‘लोकमत’ ने बुधवारच्या अंकात वनविभागाचा दुजाभावाचा प्रकार प्रकाशित केल्यानंतर वन प्रशासनाने बुधवारी सकाळीच तातडीचे आदेश काढत सर्व पासधारकांना प्रवेश देण्याचा निर्णय घेतला आहे.

केवळ पासधारकांना दिला जाणार प्रवेश
शहरात अजूनही कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत सर्वच नागरिकांना प्रवेश देण्याचा निर्णय घेतला तर एकाचवेळी उद्यानात मोठी गर्दी होवू शकते. त्यामुळे दैनंदिन शुल्क आकारून प्रवेश सध्यातरी दिला जाणार नसून, केवळ वार्षिक व मासिक पास काढलेल्या नागरिकांनाच उद्यानात प्रवेश दिला जाणार असल्याची माहिती उपवनसंरक्षक डीगंबर पगार यांनी दिली. जर कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला तर सर्वांसाठीच उद्यान उघडे केले जाईल. दरम्यान, सकाळी ५.३० ते ८ व सायंकाळी ६ ते ८ वाजेपर्यंत हे उद्यान सुरु राहणार आहे.

शहरातील उद्यानेही उघडले
महापालिका प्रशासनाने देखील महात्मा गांधी, भाऊंचे उद्यान व बहिणाबाई उद्यान देखील सकाळी व सायंकाळी प्रत्येकी दोन तासासाठी उघडली आहेत. मात्र, याठिकाणीही सोशल डिस्टन्सिंगचे पालन नागरिकांना क रावे लागणार असून, मास्क देखील बंधनकारक करण्यात आला आहे.
दरम्यान, कोरोना रुग्णांची वाढणारी संख्या पाहता उद्याने देखील काही दिवस परत बंद ठेवण्यात येण्याची शक्यता आहे अशी माहिती मनपाच्या सूत्रांनी दिली.

Web Title: Finally, the Landorkhori Park is open to pass holders as well

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.