अखेर मनपातर्फे अंबरझरा पाटचारीची सफाई पूर्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2021 04:12 AM2021-06-10T04:12:10+5:302021-06-10T04:12:10+5:30
प्रभाव ''लोकमत''चा : पाटचारीतून काढला ५० टन गाळ जळगाव : मेहरुण तलावाचा मुख्य जलस्त्रोत असलेल्या अंबरझरा तलावाच्या पाटचारीत मोठ्या ...
प्रभाव ''लोकमत''चा : पाटचारीतून काढला ५० टन गाळ
जळगाव : मेहरुण तलावाचा मुख्य जलस्त्रोत असलेल्या अंबरझरा तलावाच्या पाटचारीत मोठ्या प्रमाणावर कचरा आणि गाळ साचल्याने ही पाटचारी तुडुंब भरल्याबाबतचे वृत्त 'लोकमत'ने गेल्या आठवड्यात प्रकाशित केले होते. तसेच पर्यावरणप्रेमींच्या मागणीनुसार पावसाळ्यापूर्वी मनपाने या पाटचारीची स्वच्छता करण्याबाबतही लक्ष वेधले होते. या वृत्ताची व मागणीची दखल घेत मनपा प्रशासनातर्फे नुकतीच जेसीबीच्या साहाय्याने अंबरझरा पाटचारीची पूर्ण स्वच्छता करण्यात आली आहे. या पाटचारीतून जेसीबीने ५० टनहून अधिक गाळ काढण्यात आला आहे.
जळगाव शहराचे वैभव असलेल्या मेहरुण तलावात गेल्या अनेक वर्षांपासून अंबरझरा या तलावातूनच पाणीपुरवठा होतो. मेहरुण तलावाचा हा एकच मुख्य जलस्त्रोत आहे. हा तलाव भरल्यानंतर पाटचारीद्वारे हे पाणी अंबरझरा तलावात येते. गेल्यावर्षी या पाटचारीची मराठी प्रतिष्ठानमार्फत सफाई करून, पाटचारीतील संपूर्ण गाळ काढण्यात आला होता. तसेच पाटचारी खोलही करण्यात आली होती. मात्र, या पाटचारीला लागून असलेल्या नागरीवस्तीमुळे मोठ्या प्रमाणावर काडी-कचरा या पाटचारीत जमा होतो. गेल्यावर्षी या पाटचारीची सफाई केल्यानंतर, आता पुन्हा या ठिकाणी काडी-कचरा व गाळ साचला आहे. त्यामुळे पावसाळा सुरू होण्यापूर्वी तातडीने पाटचारीची स्वच्छता करण्याची मागणी पर्यावरणप्रेमींमधून करण्यात येत होती. तसेच याबाबत मराठी प्रतिष्ठानच्या वतीने विजय वाणी यांनीही महापौरांना भेटून पाटचारी साफसफाई करण्याची मागणी केली होती. त्यानंतर महापौर जयश्री महाजन यांनी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देऊन या पाटचारीची सफाई नुकतीच पूर्ण केली आहे.
इन्फो :
..तर तलावही लवकर पूर्ण भरणार
मेहरुण तलावात अंबरझरा तलावाच्या पाटचारीद्वारेच पाणी येते. सध्या हा एकच तलावाचा मुख्य जलस्त्रोत आहे. जर पाटचारीची पावसाळ्यापूर्वी स्वच्छता केली नाही तर तलावाकडे येणारा पाण्याचा स्रोत मंदावत असतो. त्यामुळे तलाव अपूर्ण भरण्याची शक्यता राहते. मात्र, यंदाही पावसाळ्यापूर्वी मनपाने पाटचारीची पूर्ण स्वच्छता केल्यामुळे हा तलाव यंदा पूर्ण भरणार असल्याचे पर्यावरणप्रेमींनी सांगितले.