अखेर नशिराबादला ग्रामपंचायत निवडणुकीची अधिसूचना जारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2020 04:15 AM2020-12-24T04:15:56+5:302020-12-24T04:15:56+5:30
जळगाव / नशिराबाद : नशिराबाद ग्रामपंचायत नगरपरिषदेत परिवर्तीत करण्याच्या हालचाली असल्या तरी सध्या ग्रामपंचायत निवडणूक प्रक्रिया सुरू झाल्याने ...
जळगाव / नशिराबाद : नशिराबाद ग्रामपंचायत नगरपरिषदेत परिवर्तीत करण्याच्या हालचाली असल्या तरी सध्या ग्रामपंचायत निवडणूक प्रक्रिया सुरू झाल्याने या ग्रामपंचायतचीदेखील अधिसूचना काढण्यात आली आहे. ज्या वेळी निवडणूक आयोगाचे आदेश येतील, त्या वेळी ज्या टप्प्यावर निवडणूक प्रक्रिया असेल तेथे ती थांबविण्यात येईल, असे तालुका प्रशासनाच्यावतीने स्पष्ट करण्यात आले आहे.
राज्यभरात ग्रामपंचायत निवडणुकीचे वारे वाहत असताना राज्यातील १५ ग्रामपंचायतींसह नशिराबाद ग्रामपंचायत नगरपरिषदेत परिवर्तीत करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे नशिराबादची निवडणूक तीन महिने पुढे ढकलण्यात यावी, अशी विनंती नगरविकास विभागाने निवडणूक आयोगाकडे केली आहे. त्यामुळे नशिराबाद ग्रामपंचायतीच्या निवडणुकीविषयी संभ्रम निर्माण झाला आहे. त्यामुळे या ग्रामपंचायतीची अधिसूचना जारी होते की नाही, या विषयी लक्ष लागून होते. यात नशिराबाद ग्रामपंचायत निवडणुकी अधिसूचना जारी होऊन २३ डिसेंबरपासून अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली. मात्र पहिल्या दिवशी एकही अर्ज दाखल होऊ शकला नाही.
अधिसूचना जारी झाली असली तरी या दरम्यान निवडणूक आयोगाकडून काही सूचना आल्यास निवडणूक प्रक्रिया ज्या टप्प्यावर आहे, तेथे ती थांबविण्यात येणार आहे.
नशिराबादला तयारी व संभ्रमही
अधिसूचना जारी झाल्याने इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया व त्यासाठी लागणाऱ्या कागदपत्रांची जुळवाजुळव करणे सुरू केले. त्यामुळे गावात निवडणुकीची जोरदार तयारी सुरू असल्याचे चित्र आहे. ही लगबग सुरू असताना नगरपंचायतीचा अध्यादेश जारी होत आहे, या चर्चेला उधाण आल्यामुळे इच्छुक उमेदवारांमध्ये पुन्हा संभ्रम निर्माण झाला आहे.
——————-
नशिराबाद ग्रामपंचायतीदेखील अधिसूचना जारी करण्यात आली आहे. नगरपंचायीसंदर्भात अद्याप काहीही सूचना नसल्याने ज्या वेळी निवडणूक आयोगाकडून काही सूचना येतील त्या वेळी निवडणूक प्रक्रिया ज्या टप्प्यावर आहे, तेथे ती थांबविण्यात येईल.
- नामदेव पाटील, तहसीलदार.