अखेर कजगावातील सराफ बाजारात पोलिसांची गस्त सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2021 04:12 AM2021-07-12T04:12:07+5:302021-07-12T04:12:07+5:30
कजगाव, ता. भडगाव : ‘चोरीच्या सत्राने सराफ बाजारात भीती’चे ठळक वृत्त दि.११च्या ‘लोकमत’ला झळकताच पोलीस निरीक्षक अशोक उतेकर यांच्या ...
कजगाव, ता. भडगाव : ‘चोरीच्या सत्राने सराफ बाजारात भीती’चे ठळक वृत्त दि.११च्या ‘लोकमत’ला झळकताच पोलीस निरीक्षक अशोक उतेकर यांच्या सूचनेनुसार कजगाव मदत केंद्रावरील पोलिसांनी सराफ बाजारात फेरफटका मारण्यास प्रारंभ केला आहे. सोबतच सराफ बाजारातील एटीएमची पाहणी करून कोणत्या सराफ व्यावसायिकांनी सीसीटीव्ही लावले आहेत याची माहिती जाणून घेत जेथे सीसीटीव्ही नाहीत अशा व्यापाऱ्यांना ते लावण्याबाबतच्या सूचना दिल्या.
काही दिवसांपूर्वी यावल येथे दिवसा सराफ दुकान लुटण्यात आले होते. कजगावची सराफ बाजारपेठदेखील मोठी आहे. मात्र, कोणतीही सुरक्षा येथे नाही. सोबतच इतरही व्यापाराची मोठी बाजारपेठ व इतर व्यवसाय याबाबतचे ठळक वृत्त दि. १२च्या ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध होताच भडगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अशोक उतेकर यांनी कजगाव मदत केंद्रावर नेमणुकीस असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना सक्त सूचना देत सराफ बाजारात फेरफटका मारण्याचे आदेश दिले. सोबतच कजगाव सराफ बाजाराचा फेरफटका हा माझ्या मोबाईलवर लाईव्ह दाखविण्याची सूचना दिल्याने कजगाव मदत केंद्रावरील पोलीस कर्मचाऱ्यांनी सराफ बाजाराचा लाईव्ह फेरफटका मारला.
दरम्यान, सर्व सराफ दुकानांना भेट देऊन तेथे लावण्यात आलेल्या सीसीटीव्हीची पाहणी केली. सोबतच जेथे सीसीटीव्ही नाहीत अशा व्यापाऱ्यांना सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याबाबत सूचना दिल्या. तसेच सेंट्रल बँकेच्या एटीएमची पाहणी करण्यात आली.
व्यापारी वर्गात समाधान
भडगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अशोक उतेकर यांनी तत्काळ कजगावच्या सराफ बाजारात लाईव्ह पोलीस गस्त सुरू केल्याने व्यापारी बांधवांनी समाधान व्यक्त केले. याच पद्धतीने गस्त कायमस्वरूपी सुरू ठेवावी.
यासोबतच कजगावच्या मदत केंद्रावर कायमस्वरूपी पोलीस नेमण्यात यावे, अशी मागणी व्यापाऱ्यांनी केली आहे.