हुश्श ! अखेर मुहूर्त गवसला, कचऱ्यावर प्रक्रिया सुरु !

By सुनील पाटील | Published: August 22, 2023 06:53 PM2023-08-22T18:53:11+5:302023-08-22T18:53:18+5:30

नागरिकांची दुर्गंधीपासून मुक्तता : मनपाच्या उद्यानात वापरणार खत

Finally processing of waste started in jalgaon | हुश्श ! अखेर मुहूर्त गवसला, कचऱ्यावर प्रक्रिया सुरु !

हुश्श ! अखेर मुहूर्त गवसला, कचऱ्यावर प्रक्रिया सुरु !

googlenewsNext

जळगाव : गेल्या दीड वर्षापासून लालफितीत अडकलेल्या कचरा प्रकल्पाचा मंगळवारी मुहूर्त गवसला. कचऱ्यावर प्रकिया करण्याच्या कामास प्रत्यक्ष सुरुवात झाली आहे. कचऱ्यापासून तयार होणारे खत महापालिकेचे उद्यान, ऑक्सिजन पार्क आदी ठिकाणी वापरले जाणार आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे या भागातील रहिवाशांची धूर व दुर्गंधीपासून मुक्तता झाली आहे.

महानगरपालिकेच्या आव्हाणे शिवारातील जागेत खत प्रकल्प उभारण्यात आलेला आहे. संपूर्ण शहरातून संकलित होणारा कचरा या याठिकाणी आणला जातो. आजच्या घडीला तीन लाख क्युबिक मीटर कचरा साचलेला आहे. कोर इंजिनिअर अँड कन्सल्टंट प्रायव्हेट लिमिटेड अमरावती या कंपनीला काम देण्यात आले असून मंगळवारी कचऱ्यापासून खत प्रक्रिया करण्याच्या कामाला सुरुवात झाली. महापौर जयश्री महाजन यांच्याहस्ते नारळ वाढवून त्याचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी उपमहापौर कुलभूषण पाटील, विद्या गायकवाड, उपायुक्त अश्विनी गायकवाड, शहर अभियंता चंद्रकांत सोनगिरे, प्रकल्प अधिकारी योगेश बोरोले व पाणीपुरवठा उपअभियंता संजय नेमाडे आदी उपस्थित होते.

दरम्यान, जमा असलेल्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्याच्या कामास मागील महासभेत मान्यता देऊन कार्यादेश निर्गमित करण्यात आले होते. त्यानुसार या कामाचे मक्तेदार कोर इंजिनिअर अँड कन्सल्टंट प्रायव्हेट लिमिटेड अमरावती यांच्याकडून काम सुरुवात करण्यात आलेली आहे. या कामी त्रयस्त यंत्रणा शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय यांच्याकडून देखील प्राथमिक सर्वेक्षणाचे काम पूर्ण करण्यात आलेले आहे. कामाचे क्षेत्रफळ निश्चित करण्यात आले आहे.

तीन लाख क्युबिक मीटर कचरा
प्रकल्याच्या ठिकाणी आज तीन लाख क्युबिक मीटर कचरा असून पहिल्या टप्प्यात १ लाख ६७ हजार क्युबिक मीटर कचऱ्यावर प्रक्रिया करण्याचे कार्यादेश मक्तेदाराला देण्यात आले आहे. सहा महिन्यात संपूर्ण कचऱ्यावर प्रक्रिया करण्याचे उद्दीष्ट देण्यात आलेले आहे. यातून तयार होणारे खत प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविले जाणार आहे.

Web Title: Finally processing of waste started in jalgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव