अखेर आरोग्य यंत्रणेत सुधारणांना सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2020 12:04 AM2020-05-24T00:04:52+5:302020-05-24T00:05:27+5:30
कोरोनामुळे आरोग्य यंत्रणेतील त्रुटी, कमतरता झाल्या उघड, राजकीय पक्षांच्या दबावासोबत परिस्थिती ठरली कारणीभूत, यंत्रणा बळकटीकरण मोहिमेत सातत्य हवे
मिलिंद कुलकर्णी
खान्देशात कोरोना रुग्णांचा आकडा ५०० पार करुन गेला. ६० लोकांचे बळी गेले. अद्याप परिस्थिती नियंत्रणात आलेली नाही. जनभावना क्रोधित आहे. प्रशासकीय यंत्रणा संभ्रमित आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र व राज्य सरकारने काही पावले उचलल्याचे या आठवड्यात दिसून आले. जळगावातील मृत्यूदर सर्वाधिक आहे. आकडेवारी तशी आहे. या रुग्णांना इतरही आजार होते, असा बचाव आरोग्य यंत्रणा करीत असली तरी ते केवळ जळगावातील रुग्णांबाबत असेल काय, ती परिस्थिती राज्य आणि देशातील सगळ्याच ठिकाणी असेल. परंतु, मूळ विषयाला बगल देण्याचा प्रकार सुरु आहे. दुसरा विषय तपासणी प्रयोगशाळेचा आहे. जळगाव आणि धुळे या दोन्ही ठिकाणी शासकीय वैद्यकीय महाविद्यालये आहेत. नंदुरबारसह तिन्ही जिल्ह्यातील नमुने तपासणीसाठी पूर्वी पुण्याला पाठविले जात असत. मालेगावात उद्रेक झाल्यानंतर राज्य शासनाने तातडीने धुळ्यात प्रयोगशाळा सुरु केली. मालेगाव सोबत अमळनेरात विस्फोट झाला आणि रुग्णसंख्या वाढू लागली. तालुका पातळीवर नमुने घेण्याची सुविधा केल्यानंतर नमुन्यांचे प्रमाण वाढले. धुळ्याच्या प्रयोगशाळेवर ताण येऊ लागला. अकोल्यात नमुने पाठविले असता तेथे बुलढाण्याचा भार अधिक होता. परिणाम असा होऊ लागला की, नमुन्यांचा अहवाल येण्याआधी काही रुग्णांचे निधन होऊ लागले. बाधित आणि संशयित असे दोन्ही रुग्ण एकाच ठिकाणी ठेवल्याने संसर्गाचा धोका वाढला. अहवाल येण्यापूर्वीच मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिल्याने आणि बाधित नसल्याचे समजून विधिवत अंत्यसंस्कार झाल्याने संसर्ग अधिक झाल्याचे अमळनेरसारखे उदाहरण समोर आले. अखेर जळगावात प्रयोगशाळेसाठी दबाव वाढला. मंजुरी मिळाली, यंत्रसामुग्री आली. आता लवकरच ही प्रयोगशाळा कार्यान्वित होईल. भुसावळला ट्रॉमा सेंटर, चाळीसगावला रुग्णालय आणि उप जिल्हारुग्णालयाचे सक्षमीकरणाचा निर्णय प्रशासनाने घेतला. योग्य दिशेने आता पावले पडत आहे. जळगावातील वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता याठिकाणी समूह संसर्गाची चाचपणी करण्यासाठी केंद्रीय संस्था, आयसीएमआरचे वैद्यकीय अधिकारी आणि त्यांचे १५ तज्ज्ञांचे पथक एक दिवसासाठी जळगावात येऊन गेले. १० गावांमध्ये जाऊन प्रत्येकी ४० लोकांचे रक्तनमुने त्यांनी घेतले. चेन्नईच्या प्रयोगशाळेत त्याची तपासणी होईल आणि निष्कर्ष काही दिवसात येतील. हा निष्कर्ष कोरोनाच्या लढाईत उपयोगात येईल. आरोग्य यंत्रणेत कार्यरत असलेल्या आमदार गिरीश महाजन यांनी पुढाकार घेऊन जळगाव महापालिकेच्या नानीबाई रुग्णालयात अत्याधुनिक प्रयोगशाळा उभारण्याचा संकल्प सोडला आहे. जी.एम.फाऊंडेशन, साई ग्रामीण फाउंडेशन आणि महापालिका यांच्या संयुक्त प्रयत्नाने अल्पदरात रक्त तपासणीसह इतर तपासण्या करुन मिळणार आहेत. खाजगी संस्थांनी पुढाकार घेण्याचा हा स्वागतार्ह प्रयत्न आहे. महाजन यांच्या या कृतीचे अनुकरण इतर राजकीय नेते करतात, हे देखील बघायला हवे.
जळगाव व धुळे येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील अधिष्ठात्यांची उचलबांगडी ही सार्वजनिक आरोग्य यंत्रणेतील सुधारणांची सुरुवात आहे. कोरोनामुळे या यंत्रणेतील कमतरता, त्रुटी आणि मर्यादा ठळकपणे समोर आल्या.
कोरोनाचे संकट टळले की, पुन्हा या
यंत्रणेकडे दुर्लक्ष व्हायला नको. शासकीय सेवेतील २३५ वैद्यकीय अधिकारी संकट काळात कामावर हजर होत नसतील, तर त्यांच्यावरदेखील अधिष्ठात्यांप्रमाणे कारवाई व्हायला हवी. नियुक्ती होऊनही रुजू न होणारे, बंधपत्र करुनही सेवा न देणाऱ्या डॉक्टरांविषयी कठोर निर्णय सरकारने घ्यायला हवे. ग्रामीण भागातील आरोग्य यंत्रणा सक्षमीकरणासाठी प्रयत्न व्हावे.