अखेर 'कुलगुरू शोध समिती' स्थापन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2021 04:12 AM2021-07-08T04:12:36+5:302021-07-08T04:12:36+5:30
जळगाव : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या कुलगुरू पदासाठीच्या निवड प्रक्रियेच्या हालचालींना आता पुन्हा सुरुवात झाली आहे. नुकतीच ...
जळगाव : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या कुलगुरू पदासाठीच्या निवड प्रक्रियेच्या हालचालींना आता पुन्हा सुरुवात झाली आहे. नुकतीच कुलपतींकडून 'कुलगुरू शोध समिती' स्थापन करण्यात आली असून, या समितीच्या अध्यक्षपदी जम्मू आणि काश्मीरचे सेवानिवृत्त मुख्य न्यायाधीश महेश मित्तल यांची निवड करण्यात आली आहे.
कार्यकाळ संपण्यापूर्वी प्रा. पी. पी. पाटील यांनी कुलगुरू पदाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे सद्य:स्थितीला यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. ई. वायुनंदन विद्यापीठाच्या प्रभारी कुलगुरू पदाची जबाबदारी सांभाळत आहेत. ८ एप्रिल रोजी प्रभारी कुलगुरू ई. वायुनंदन यांच्या अध्यक्षतेखाली व्यवस्थापन व विद्या परिषदेची ऑनलाइन बैठक पार पडली होती. त्यात कुलगुरू शोध समितीच्या सदस्यपदासाठी विद्यापीठाकडून खडगपूर आयआयटीचे प्रा.डॉ. वीरेंद्र तिवारी यांची निवड करण्यात आली होती.
तीन महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर समिती स्थापन
विद्यापीठाकडून कुलगुरू शोध समितीच्या सदस्यपदासाठी कुलपतींकडे प्रा.डॉ. वीरेंद्र तिवारी यांच्या नावाची शिफारस एप्रिल महिन्यात केली गेली होती. नंतर कुलगुरू निवड प्रक्रिया थंडावली होती. प्रतीक्षा होती ती समिती स्थापन करण्याची. अखेर तीन महिन्यांनंतर कुलपती यांनी कुलगुरू शोध समिती स्थापन केली आहे. तसे पत्रसुद्धा विद्यापीठाला कुलपती कार्यालयाकडून प्राप्त झाले आहे.
समितीत यांचा समावेश
कुलगुरू शोध समितीच्या अध्यक्षपदी जम्मू आणि काश्मीरचे सेवानिवृत्त मुख्य न्यायाधीश महेश मित्तल तसेच सदस्य म्हणून खडगपूर आयआयटीचे वीरेंद्रकुमार तिवारी, उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव ओम प्रकाश गुप्ता यांची निवड करण्यात आली आहे. समन्वय अधिकारी म्हणून विद्यापीठाचे प्रभारी कुलसचिव डॉ. शामकांत भादलीकर हे काम पाहणार आहेत. समितीला आवश्यक माहिती देण्याची जबाबदारी त्यांच्याकडे सोपविण्यात आली आहे.
अशी असेल निवड प्रक्रिया
कुलगुरू शोध समिती स्थापन झाली असून, आता कुलगुरू निवडीसाठीचे निकष, पात्रता आणि इतर बाबी निर्धारित होतील. तसेच तीन ते चार दिवसांत विद्यापीठाकडून कुलगुरू पदासाठी जाहिरात प्रकाशित केली जाणार आहे. त्यानंतर समितीकडे आलेल्या अर्जांच्या छाननीनंतर प्रत्यक्ष मुलाखती घेऊन अंतिम पाच संभावित कुलगुरूंची नावे कुलपती कार्यालयाकडे पाठविण्यात येतील. त्यानंतर कुलपती स्वत: त्या उमेदवारांची मुलाखत घेऊन कुलगुरू निवडीची घोषणा करतील. या संपूर्ण प्रक्रियेला किमान तीन ते चार महिन्यांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे.
राजकीय हस्तक्षेप नसावा....
विद्यापीठाच्या कुलगुरू पदावर आता कोण विराजमान होईल, त्याची चर्चा पुन्हा सुरू झालेली आहे. सध्या विद्यापीठात राजकीय हस्तक्षेप होत असल्याचीही गेल्या काही दिवसांपासून चर्चा आहे. त्यामुळे निवड झालेल्या कुलगुरूंनी कुठल्याही राजकीय पक्षाच्या दबावाला बळी पडू नये, अशीही अपेक्षा होत आहे.
------------------
समिती स्थापन करण्यात आली आहे. समितीच्या अध्यक्षपदावर जम्मू आणि काश्मीरचे सेवानिवृत्त मुख्य न्यायाधीश महेश मित्तल यांची निवड केली गेली आहे. आता लवकरच विद्यापीठाकडून कुलगुरू पदासाठीची जाहिरात प्रसिद्ध केली जाणार आहे.
- ई. वायुनदंन, प्रभारी कुलगुरू, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ