डिसेंबरपासून आर्थिक गणनेला सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2019 09:46 PM2019-11-27T21:46:19+5:302019-11-27T21:46:30+5:30

जळगाव : केंद्र सरकारतर्फे देशामध्ये सातव्या आर्थिक गणनेचे काम सुरु करण्यात आले असून डिसेंबर २०१९ च्या पहिल्या सप्ताहापासून आर्थिक ...

Financial calculation started from December | डिसेंबरपासून आर्थिक गणनेला सुरुवात

डिसेंबरपासून आर्थिक गणनेला सुरुवात

Next

जळगाव : केंद्र सरकारतर्फे देशामध्ये सातव्या आर्थिक गणनेचे काम सुरु करण्यात आले असून डिसेंबर २०१९ च्या पहिल्या सप्ताहापासून आर्थिक गणनेचे प्रत्यक्ष क्षेत्रीय काम सुरु करण्याचे प्रस्तावित केले आहे. यामध्ये कुटुंबांची, आस्थापनेची संपूर्ण माहिती प्रत्येक स्तरावर गोपनीय राहणार आहे. तसेच आर्थिक गणनेच्या प्रत्यक्ष क्षेत्रीय कामांतर्गत कुटुंबाने किंवा आस्थापनाने चुकीची किंवा माहिती देण्यास नकार दिल्यास कायद्यांतर्गत दंडात्मक कारवाईची तरतूद केलेली आहे. जळगाव जिल्ह्यात आर्थिक गणनेचे काम अचूकपणे तसेच विहित मुदतीमध्ये पूर्ण होण्याकरिता जनतेने सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा आर्थिक गणणेचे चार्ज आॅफिसर डॉ.अविनाश ढाकणे यांनी केले आहे.
आर्थिक गणनेमध्ये देशामधील सर्व आर्थिक घटकांची मोजणी करण्यात येणार आहे. आर्थिक गणनेची माहिती संकलित करणे, अहवाल जाहीर करणे, केंद्र स्तरावर निर्णय घेणे इत्यादी बाबी सांख्यिकी व कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयामार्फत करण्यात येणार आहे. माहिती संकलनाचे काम मोठ्या स्वरुपात असल्यामुळे हे काम केंद्र शासनाने सीएससी ई-गव्हर्नन्स सर्व्हिसेस इंडिया लि. या संस्थेव्दारे पूर्ण करण्याचे निश्चित केले आहे. आर्थिक गणनेतंर्गत माहिती संकलनाचे काम प्रत्येक घरोघरी तसेच व्यापारी प्रतिष्ठानांना प्रत्यक्ष भेट देवून त्यांची माहिती पेपरलेस पध्दतीने मोबाइल आज्ञावलीव्दारे संकलित करण्यात येणार आहे. ही गणना देशामधील असंघटीत क्षेत्रातील आर्थिक घटकांच्या एकत्रित माहितीचा मुख्य स्त्रोत असणार आहे.
आर्थिक गणनेचे माहिती संकलन ग्रामपंचायत तसेच शहरातील प्रभाग स्तरावर होणार असून या माहितीचा उपयोग उद्योग, प्रामुख्याने सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांकरीता धोरण तयार करणे तसेच स्थानिक पातळीवर नियोजन करण्याकरीता होणार आहे.

जळगाव जिल्ह्यामध्ये आर्थिक गणनेच्या बाबतीत ई-गव्हर्नन्स सर्व्हिसेस इंडिया लि. यांना मार्गदर्शन करणे, प्रत्यक्ष क्षेत्रीय कामावर नियंत्रण ठेवणे तसेच राज्यस्तर व केंद्रस्तरावर समन्वय ठेवण्याकरीता जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली १५ सदस्यीय जिल्हास्तरीय सनियंत्रण व समन्वय समितीची स्थापना करण्यात आलेली आहे. संबंधित संस्थेने निश्चित संख्येप्रमाणे प्रगणक व पर्यवेक्षक यांची नोंदणी करणे, परीक्षा घेणे, उत्तीर्ण उमेदवारांना नियुक्ती देणे, प्रशिक्षण देणे, ओळखपत्र देणे बाबी तातडीने पूर्ण करणे आवश्यक आहे. जिल्ह्णामध्ये आर्थिक गणनेचे काम पूर्ण करण्याकरीता २४४१ प्रगणक व १२३६ पर्यवेक्षकांची आवश्यकता असून संबंधित संस्थेने आजपर्यंत २३६५ प्रगणक व ८७३ पर्यवेक्षकांची नोंदणी पूर्ण केलेली आहे.
राज्य शासनाच्या नियोजन विभागाकडून राज्यामध्ये डिसेंबर २०१९ च्या पहिल्या सप्ताहापासून आर्थिक गणनेचे प्रत्यक्ष क्षेत्रीय काम सुरु करण्याचे प्रस्तावित केले आहे. त्या दृष्टीने संस्थेने प्रत्यक्ष क्षेत्रीय काम सुरु करण्याकरीता तयारी केलेली आहे. आर्थिक गणनाचे प्रत्यक्ष क्षेत्रीय काम तीन महिन्यांच्या कालावधीमध्ये पूर्ण करण्यात येणार आहे.
आर्थिक गणना करण्याकरिता आपल्याकडे येणाऱ्या प्रगणक व पर्यवेक्षकांना जनतेने सहकार्य करावे, असे आर्थिक गणनेचे जिल्हा सांख्यिकी अधिकारी तथा सदस्य सचिव प्रमोदर पाटील यांनी जिल्ह्णातील सर्व नागरिकांना तसेच सर्व आस्थापनांना केले आहे.

Web Title: Financial calculation started from December

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.