गाळेधारकांकडील वसुलीवरच मनपाची आर्थिक परिस्थिती अवलंबून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2021 04:22 AM2021-02-26T04:22:22+5:302021-02-26T04:22:22+5:30
मुदत संपलेले मार्केट - २३ गाळेधारक - २६०८ थकीत वसुली - २८३ कोटी आतापर्यंत झालेली वसुली - ...
मुदत संपलेले मार्केट - २३
गाळेधारक - २६०८
थकीत वसुली - २८३ कोटी
आतापर्यंत झालेली वसुली - सुमारे ११० कोटी
मुदत संपली - २०११-१२
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव - मनपाच्या मुदत संपलेल्या मार्केटमधील गाळेधारकांकडे असलेल्या थकबाकीच्या रकमेवरच मनपाची आर्थिक स्थिती अवलंबून असून, ही कार्यवाही करणे गरजेचे आहे. वसुलीशिवाय पर्याय नसून त्यावर जळगावकरांना सुविधा देणे शक्य होणार असल्याचे परखड मत मनपा आयुक्त सतीश कुलकर्णी यांनी गुरुवारी अंदाजपत्रक सादर करण्याआधी आपल्या मनोगतात व्यक्त केले. गाळेधारकांकडील नुकसानभरपाईची रक्कम वसूल करण्यासंदर्भातील प्रस्तावदेखील महासभेपुढे सादर करण्यात आल्याची माहिती आयुक्तांनी यावेळी दिली.
मनपा मुदत संपलेल्या मार्केटमधील गाळेधारकांचा प्रश्न गेल्या ९ वर्षांपासून प्रलंबित असून, यावर अद्यापही तोडगा काढण्यात आलेला नाही. शहरातील नागरिकांना सुविधा देण्याचे मनपासमोर आव्हान असून, या सुविधा देण्यासाठी महापालिकेची आर्थिक परिस्थिती सक्षम असणे गरजेचे आहे. मनपाची आर्थिक परिस्थीती हे केवळ मुदत संपलेल्या मार्केटमधील गाळेधारकांचा प्रश्नावर अवलंबून असून, यासाठी कार्यवाही करणे गरजेचे असल्याचेही आयुक्तांनी सांगितले. आयुक्तांनी सादर केलेल्या मनोगतावरून मनपा प्रशासनाने गाळेधारकांबाबतचे धोरण निश्चित केले असून, कारवाईसाठी मनपाने तयारी सुरू केल्याचेच संकेत दिसून येत आहेत.
काय म्हणाले आयुक्त
१. मुदत संपलेल्या गाळ्यांच्या बाबतीत, मागील कालावधीमध्ये विविध न्यायालयाचे झालेले निर्णय राज्य शासनाकडून वेळोवेळी देण्यात आलेले आदेश, तसेच अधिनियमातील कलम ७९ मध्ये सन २०१८ मध्ये करण्यात आलेली विचारात घेऊन या गाळ्यांच्या पुढील कालावधीसाठी करावयाच्या हस्तांतरणाबाबत सविस्तर प्रस्ताव नुकताच महासभेपुढे निर्णयासाठी सादर करण्यात आला असल्याची माहिती यावेळी आयुक्तांनी दिली.
२. महानगरपालिकेच्या स्वत:च्या उत्पन्नापैकी व्यापारी संकुलातोल गाळ्यांपासून मिळणारे उत्पन्न हे प्रमुख आहे. यावरच महानगरपालिकेची आर्थिक स्थिती अवलंबून असल्याचेही आयुक्तांनी म्हटले आहे. गेल्या ८ वर्षांपासून हा विषय प्रलंबित असल्यामुळे मुदत संपलेल्या गाळ्यांची नुकसान भरपाईची रक्कम मोठ्या प्रमाणात येणे असून ती वसूल करण्याच्या संदर्भात महानगरपालिकेस त्वरित कार्यवाही करणे गरजेचे आहे.