प्लॅस्टिकला पर्याय शोधा, नंतर बंदी घाला - कैलाश मुरारका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2019 01:03 PM2019-11-24T13:03:32+5:302019-11-24T13:04:00+5:30
प्लॅस्टिकपासून इंधन निर्मितीसह रस्ते बांधणीलाही होऊ शकतो उपयोग
विजयकुमार सैतवाल
जळगाव : प्लॅस्टिक निर्मूलनाचे योग्य नियोजन केले तर ते घातक ठरू शकत नाही. उलट प्लॅस्टिकपासून इंधन निर्मिती होण्यासह रस्ते बांधणीतही त्याचा उपयोग होऊ शकतो. प्लॅस्टिक हे बहुउपयोगी असून त्यावर बंदी घालायचीच असल्यास त्यापूर्वी त्याला किमान पर्याय तरी सूचविला पाहिजे व त्यानंतर त्यावर बंदी घातली पाहिजे, असे स्पष्ट मत आॅल इंडिया प्लॅस्टिक्स मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनतर्फे मुंबई येथे होणाऱ्या ‘प्लास्टीव्हीजन इंडिया २०२०’ प्रदर्शन आयोजन समितीचे अध्यक्ष कैलाश मुरारका यांनी व्यक्त केले.
‘प्लास्टीव्हीजन इंडिया २०२०’ या प्रदर्शनाविषयी माहिती देण्यासाठी मुरारका हे जळगावात आले होते, त्या वेळी त्यांच्याशी चर्चा केली. त्या प्रसंगी त्यांच्याशी झालेला हा संवाद....
प्रश्न - प्लॅस्टिकबंदीच्या निर्णयाबद्दल प्लॅस्टिक उद्योगाची काय भूमिका राहणार?
उत्तर - गेल्या वीस वर्षात प्लॅस्टिकच्या वापरात अत्यंत वेगाने वाढ झाल्याने प्लॅस्टिक विरोधात अचानक वातावरण निर्मिती करण्यात येत आहे. प्लॅस्टिक बंदीबाबत केंद्र सरकारच्या निर्णयाचे स्वागत आहे. मात्र प्लॅस्टिक घातक नसून त्याच्या वापराच्या सवयी चुकीच्या आहे. आज सर्वच क्षेत्रात, सर्वच ठिकाणी प्लॅस्टिक उपयोगी पडत आहे. त्याचा उपयोग करून त्याची योग्य विल्हेवाट लावली तर ते घातक ठरूच शकत नाही. तरीही ते बंद करायचे असल्यास त्यास योग्य पर्याय शोधला पाहिजे.
प्रश्न - कागदी वस्तूंचा पर्याय योग्य ठरू शकतो का?
उत्तर - प्लॅस्टिकपेक्षा कागद निर्मितीला जास्त खर्च येतो. सोबतच त्यासाठी जास्त वृक्षांची तोड होऊन ते पर्यावरणास घातक ठरणारे आहे व त्यातून प्रदूषणही अधिक वाढते. त्यामुळे याचा विचार केला तर प्लॅस्टिक घातक नाही.
प्रश्न - प्लॅस्टिक नष्ट होत नसल्याने ते पर्यावरणास बाधा ठरते, त्यावर काही पर्याय ?
उत्तर - प्लॅस्टिक हे बहुउपयोगी आहे. त्याच्या वापरानंतर त्यापासून इंधन निर्मिती होऊ शकते. इतकेच नव्हे तर रस्ते बांधणीला तो एक चांगला पर्याय आहे.
मंदीची चिंता न करता ती एक संधी मानली पाहिजे. उद्योगात गुंतवणुकीची हीच योग्य वेळ आहे. त्यामुळे याचा सर्वांना लाभ घेतला पाहिजे. प्लॅस्टिकचा वापर प्रत्येकाने काळजीपूर्वक केला व त्याची योग्य विल्हेवाट लावली तर त्याचा कोणाला त्रास होणार नाही व पर्यावरणासही बाधा पोहचणार नाही.
- कैलाश मुरारका, अध्यक्ष, प्लास्टीव्हीजन इंडिया आयोजन समिती