मक्तेदार शोधा अन् जळगावातील शिवाजीनगर उड्डाणपूलाचे काम तातडीने मार्गी लावा - पालकमंत्र्यांची सूचना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 2, 2018 12:54 PM2018-10-02T12:54:06+5:302018-10-02T12:54:35+5:30
महामार्गाच्या साईडपट्ट्यांची सा.बां.विभाग करणार दुरुस्ती
जळगाव : शिवाजीनगर रेल्वे उड्डाणपुलाच्या कामात आता शासकीय पातळीवर कोणताही अडसर राहिलेला नसल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने मक्तेदार मिळवून काम मार्गी लावण्याच्या सूचना पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सोमवारी नियोजन समितीच्या बैठकीत सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता प्रशांत सोनवणे यांना दिल्या. तसेच शहरातून जाणाऱ्या राष्टÑीय महामार्गाच्या समांतर रस्त्याच्या कामास ‘नही’कडून विलंब होत असल्याने ते काम मार्गी लागेपर्यंत सार्वजनिक बांधकाम विभागामार्फतच साईडपट्ट्यांची दुरूस्ती करण्यासाठी डीपीआर तयार करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.
नियोजन समितीच्या बैठकीत आमदार सुरेश भोळे यांनी समांतर रस्त्यांचा विषय उपस्थित करीत महामार्गाच्या साईडपट्ट्यांच्या दुरुस्तीचे कामही अर्धवट झालेले असल्याने अपघात होत असल्याचे सांगितले.
समांतर रस्त्यास विलंब; साईडपट्यांची दुरुस्ती
आमदार भोळेंच्या प्रश्नातर पालकमंत्री म्हणाले, ‘नही’कडून महामार्गाच्या तसेच समांतर रस्त्यांच्या कामास वेळ लागेल. तोपर्यंत हा महामार्ग ‘नही’च्या ताब्यात असला तरीही लोकांच्या हितासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून साईडपट्ट्यांची दुरूस्ती केली जाईल. त्यासाठी देखभाल दुरुस्तीच्या निधीतून खर्च करता येईल, असे सांगून अधीक्षक अभियंता सोनवणे यांना डिपार्टमेंटल डीपीआर तयार करण्याच्या सूचना पालकमंत्र्यांनी दिल्या.
नागरिकांचा होतोय विरोध
शिवाजीनगर पुलाचा एक रस्ता सरळ ममुराबादकडे जाण्यासाठी खाली उतरविण्यास त्या परिसरातील काही नागरिकांचा विरोध आहे. रेल्वे रूळाच्या बाजूने उजव्या बाजूस हा रस्ता उतरवावा अशी मागणी केली जात आहे.