अवैध वाळू साठ्याप्रकरणी १७ लाखावर भरला दंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2020 04:32 AM2020-12-16T04:32:43+5:302020-12-16T04:32:43+5:30
जळगाव : औद्योगिक वसाहत परिसरात साठवून ठेवलेल्या वाळू साठ्याच्या खुलासा अमान्य झाल्यानंतर या साठ्याप्रकरणी १७ लाख २३ हजार ८०० ...
जळगाव : औद्योगिक वसाहत परिसरात साठवून ठेवलेल्या वाळू साठ्याच्या खुलासा अमान्य झाल्यानंतर या साठ्याप्रकरणी १७ लाख २३ हजार ८०० रुपये दंडाची रक्कम शासकीय खजिन्यात भरणा केला आहे.
वाळू उपसा बंद असला तरी जळगाव शहरासह परिसरातून मोठ्या प्रमाणात वाळूची वाहतूक होत असल्याच्या तक्रारी वाढत असताना २७ जून रोजी औद्योगिक वसाहत परिसरातील डी सेक्टरमधील प्लॉट क्रमांक ३२ मध्ये मोठ्या प्रमाणात वाळूचा साठा करून ठेवल्याची तक्रार माहिती अधिकार कार्यकर्ते दीपककुमार गुप्ता यांनी महसूल विभागाकडे केली होती. त्यानंतर मेहरुणच्या तलाठ्यांनी पाहणी केली व पंचनामा केला होता. या ठिकाणी अंदाजे ६० ते ७० ब्रास वाळूचा साठा असून, त्याची किंमत २ लाख १० हजार रुपये किंमत असल्याचे पंचनाम्यात म्हटले होते. त्यानंतर या प्रकरणी मंडळ अधिकारी व तलाठ्यांनी पंचनामा करून चेतन कृष्णा पाटील व अनिल चंद्रभान पाटील यांच्या मालकीच्या जागेत हा साठा असल्याचा तहसील कार्यालयास अहवाल सादर केला होता. त्यानुसार नोटीस बजावण्यात आली होती व या प्रकरणी संबंधितांनी १८ जुलै रोजी खुलासा सादर केला होता. मात्र खुलासा अमान्य करण्यात आला व दंडात्मक आदेश पारित करण्यात आले होते. त्यानुसार अनिल पाटील, चेतन पाटील यांनी १७ लाख २३ हजार ८०० रुपये दंडाची रक्कम शासकीय खजिन्यात भरणा केला आहे.
त्यानंतर आता या प्रकरणाचा अहवालदेखील तहसील कार्यालयाने जिल्हा खनिकर्म अधिकाऱ्यांकडे सादर केला आहे.