विनामास्क प्रवाशांकडून सव्वा लाखांचा दंड वसूल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2021 04:16 AM2021-05-11T04:16:29+5:302021-05-11T04:16:29+5:30
प्रभाव ''लोकमत'' चा : ८६३ प्रवाशांवर केली कारवाई जळगाव : कोरोनाच्या वाढत्या संसर्गातही अनेक प्रवासी विनामास्क प्रवास करत असल्याचे ...
प्रभाव ''लोकमत'' चा : ८६३ प्रवाशांवर केली कारवाई
जळगाव : कोरोनाच्या वाढत्या संसर्गातही अनेक प्रवासी विनामास्क प्रवास करत असल्याचे वृत्त 'लोकमत'ने गेल्या आठवड्यात प्रसिद्ध केल्यानंतर याची रेल्वे प्रशासनाने गंभीर दखल घेतली आहे. या विनामास्क प्रवाशांविरोधात रेल्वे प्रशासनाने धडक कारवाई मोहीम राबवून, ८६३ प्रवाशांकडून सव्वा लाखांचा दंड वसूल केला आहे.
रेल्वे मंत्रालयाने गेल्या महिन्यात १८ एप्रिल रोजी रेल्वेत विनामास्क प्रवासी आढळल्यावर त्या प्रवाशावर थेट ५०० रुपये दंडात्मक कारवाईचे आदेश दिले आहेत. या आदेशानुसार तिकीट तपासणीसह प्रवाशांनी मास्क घातला आहे की नाही, हे सुद्धा तपासणीचे आदेश देण्यात आले आहेत. मात्र, 'लोकमत' प्रतिनिधीने केलेल्या पाहणीत जळगाव स्टेशनवर थांबा असलेल्या अनेक गाड्यांमधून प्रवासी विनामास्क प्रवास करतांना आढळून आले होते. यात विशेषतः जनरल बोगींमध्ये हे विनामास्क असलेले अनेक प्रवासी दिसून आले. विशेष म्हणजे तरुण मुलांचे प्रमाण जास्त दिसून आले होते. असे असताना रेल्वे प्रशासनाकडून या प्रवाशांवर कुठल्याही प्रकारची कारवाई होत नसल्याचे वृत्त ‘लोकमत’ने दिले होते. या वृत्ताची भुसावळ विभागाचे सिनिअर डीसीएम युवराज पाटील यांनी घेऊन तत्काळ कारवाई मोहीम सुरू करण्याचे आदेश दिले होते.
इन्फो :
अन् रेल्वेची ८६३ प्रवाशांवर कारवाई
'लोकमत' या वृत्ताची दखल घेत सिनिअर डीसीएम युवराज पाटील यांनी भुसावळ विभागातील सर्व स्टेशनवर व भुसावळ विभागातून धावणाऱ्या गाड्यांमध्ये ही मोहीम राबविण्याचे आदेश दिले. त्यानुसार तिकीट निरीक्षकांनी राबविलेल्या मोहिमेत भुसावळ विभागातील ८६३ प्रवाशांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. या मध्ये १ लाख २२ हजार ६०० रुपये इतका दंड वसूल करण्यात आला. या मोहिमेमुळे विनामास्क प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे धाबे दणाणले आहे.
इन्फो :
दंडाच्या पावतीसोबत मास्कचेही वाटप
तिकीट निरीक्षकांकडून विनामास्क प्रवाशांकडून १०० रुपयांपासून ते ५०० रुपयांपर्यंत दंड आकारण्यात येत आहे. दंड आकारल्यानंतर या प्रवाशांना तिकीट निरीक्षकांकडून दंडाच्या पावतीसोबत मास्कचेही वाटप करण्यात येत आहे. तसेच कोरोनापासून बचावासाठी मास्क लावण्याचे आवाहन करण्यात येत आहे. रेल्वेच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.