विना मास्क प्रवाशांकडून सव्वा दोन लाखांचा दंड वसूल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2021 04:12 AM2021-06-06T04:12:26+5:302021-06-06T04:12:26+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : कोरोनाच्या वाढत्या संसर्गातही अनेक प्रवाशी विना मास्क प्रवास करीत असल्यामुळे, रेल्वे प्रशासनातर्फे या प्रवाशांविरोधात ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : कोरोनाच्या वाढत्या संसर्गातही अनेक प्रवाशी विना मास्क प्रवास करीत असल्यामुळे, रेल्वे प्रशासनातर्फे या प्रवाशांविरोधात कारवाई मोहीम हाती घेण्यात आली आहे. मे महिन्यात भुसावळ विभागात राबविण्यात आलेल्या मोहिमेत सुमारे २ हजार ३८ विना मास्क प्रवाशांवर कारवाई करीत त्यांच्याकडून २ लाख ३२ हजार ७५० रुपये इतका दंड वसूल केला आहे.
रेल्वे मंत्रालयाने १८ एप्रिल २०२१ रोजी रेल्वेत विना मास्क प्रवाशी आढळल्यावर, त्या प्रवाशावर थेट ५०० रुपये दंडात्मक कारवाईचे आदेश दिले आहेत. या आदेशानुसार तिकीट तपासणीसह प्रवाशांनी मास्क घातला आहे की नाही, हे सुद्धा तपासणीचे आदेश देण्यात आले आहेत. मात्र जनरल बोगींमध्ये मोठ्या प्रमाणावर विना मास्क प्रवाशांची गर्दी दिसून येत असल्याने, रेल्वे प्रशासनाने या प्रवाशांविरोधात कारवाई मोहीम हाती घेतली आहे.
भुसावळ विभागातील सर्व स्टेशनवर व भुसावळ विभागातून धावणाऱ्या गाड्यांमध्ये तिकीट निरीक्षकांकडून धावत्या गाडीमध्ये व स्टेशनवर आदळून आलेल्या विना मास्क प्रवाशांकडून २०० रुपये या प्रमाणे दंड आकारण्यात येत आहे.