बंदी असतानाही धामधुमीत लग्न करणाऱ्या वरपित्याला ५० हजारांचा दंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2021 04:17 AM2021-04-23T04:17:46+5:302021-04-23T04:17:46+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : शहरात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना, नियमांची पायमल्ली केली जात आहे. गुरुवारी ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : शहरात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना, नियमांची पायमल्ली केली जात आहे. गुरुवारी शहरातील योगेश्वर नगरात एका लग्नसोहळ्यात १०० पेक्षा अधिक वऱ्हाडी आढळून आल्याने मनपा उपायुक्तांनी वरपित्यावर ५० हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. तसेच याप्रकरणी आयोजकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राज्य शासनाने गुरुवारी लॉकडाऊनबाबत नवी नियमावली जाहीर केली असून, यामध्ये लग्नसोहळ्यामध्ये २५ पेक्षा अधिक वऱ्हाडींना परवानगी नाकारण्यात आली आहे. मात्र शहरातील योगेश्वर नगरात गुरुवारी चौधरी परिवारातर्फे लग्नसोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यामध्ये १०० हून अधिक वऱ्हाडींची उपस्थिती असल्याबाबतची तक्रार मनपा उपायुक्त संतोष वाहुळे यांच्याकडे प्राप्त झाली होती. या तक्रारीची दखल घेत उपायुक्तांनी थेट योगेश्वर नगरात लग्नस्थळी जाऊन पाहणी केली. त्यावेळी अनेक वऱ्हाडींनी मास्कदेखील घातलेला नव्हता. याबाबतचे छायाचित्रणदेखील मनपा कर्मचाऱ्यांकडून करण्यात आले आहे. त्यामुळे मनपा उपायुक्तांनी वरपित्यावर ५० हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. याप्रकरणी पोलीस ठाण्यातदेखील गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
सात दुकानदारांनी मोडला नियम; भाजीपाला विक्रेत्यांवर कारवाई
जिल्हा प्रशासनाने सकाळी ११ वाजेनंतर दुकाने उघडण्यास बंदी घातली असतानादेखील अनेक दुकानदार या नियमांकडे दुर्लक्ष करत असल्याचेही आढळून आले आहे. मनपा अतिक्रमण निर्मूलन विभागाच्या पथकातील कर्मचाऱ्यांनी शहरातील मुख्य बाजारपेठ भागात छायाचित्रणाद्वारे पाहणी केली असता सात दुकानदारांनी नियमांचा भंग केल्याचे आढळून आले आहे. या प्रकरणी संबंधित दुकानदारांना नोटीस बजावण्यात आली असून शुक्रवारी या दुकानदारांवर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती उपायुक्त संतोष वाहुळे यांनी लोकमतला दिली आहे. तसेच गणेश कॉलनी चौक परिसरातदेखील अनेक भाजीपाला विक्रेत्यांनी अनधिकृतपणे अतिक्रमण करत दुकाने दिसून आले. या ठिकाणी मनपा अतिक्रमण निर्मूलन विभागाच्या पथकाने जाऊन कारवाई केली आहे तसेच दोन ट्रॅक्टर मालदेखील जप्त केला आहे.