माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या फिर्यादीवरून अंजली दमानियांविरुद्ध गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2018 09:48 PM2018-04-19T21:48:11+5:302018-04-19T21:48:11+5:30
मुक्ताईनगर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल
आॅनलाईन लोकमत
जळगाव,दि.१९ - माजी मंत्री आमदार एकनाथराव खडसे यांना लाच प्रकरणात अडकविण्याचा कट रचल्याप्रकरणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्याविरुद्ध खुद्द खडसे यांनी मुक्ताईनगर पोलिसात गुरुवारी फिर्याद दिली. त्यावरुन दमानियांसह सहा ते सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
खडसे यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांमार्फत राज्यभरात तक्रार दाखल करुन आपला छळवाद सुरु केला आहे. त्यांनी स्वत: एकही तक्रार दिलेली नाही, असे अंजली दमानिया यांनी दोन दिवसांपूर्वी जळगावात आल्या असता पत्रकार परिषदेत सांगितले होते, त्याची दखल घेत खडसे यांनी खुद्द मुक्ताईनगर पोलिसात गुरुवारी सायंकाळी दमानियांविरुद्ध फिर्याद दिली.
त्यावरुन अंजली दमानिया व त्यांचे पती अनिश व अन्य सहा ते सात जणांविरुध्द कलम ४५१, ४५२, १४९, ११६, १२० (ब), १७६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
खडसे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, अंजली दमानिया यांनी त्यांच्या मुंबई येथील राहत्या घरी सामाजिक कार्यकर्त्या कल्पना इनामदार यांना बोलविले. यावेळी त्यांचे पती अनिश दमनिया व अन्य सहा ते सात जण उपस्थित होते. तब्बल तीन तास चाललेल्या बैठकीत दमानिया यांनी सांगितले की, तुम्हाला मी काही फाईल आणि पैसे देते. ते तुम्ही खडसे यांच्या कार्यालयात नेऊन त्यांच्या टेबलवर ठेवा आणि मी लगेच लाचलुचपत प्रतिबंध विभागाचे अधिकारी पाठवेल. आपल्याला खडसे यांना कसेही करून अडकवायचे आहे. मात्र इनामदार यांनी यास नकार दिला. दरम्यान या प्रकरणी इनामदार यांनी ११ एप्रिल रोजी मुंबई येथील पत्रकार परिषदेत ही बाब उघड केली. यावरून दमानिया यांचा मला लाचप्रकारणात अडकविण्याचा कट होता, असेही खडसे यांनी दिलेल्या फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.