सोशल मीडियात 'घडवला' खडसेंचा राष्ट्रवादीत प्रवेश, फेक न्यूज देणाऱ्याविरोधात गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2018 09:30 PM2018-04-04T21:30:04+5:302018-04-04T22:02:01+5:30
एकनाथराव खडसे यांच्या २१ आमदारांसह राष्टवादी काँग्रेस पक्षात प्रवेशाबाबत फेसबुकवर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या नावाने बनावट अकाऊंट तयार करुन बदनामी करणा-या व्यक्तीविरुध्द गुन्हा दाखल
जळगाव : माजी मंत्री तथा भाजपा आमदार एकनाथराव खडसे यांच्या २१ आमदारांसह राष्टवादी कॉँग्रेस पक्षात प्रवेशाबाबत फेसबुकवर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या नावाने बनावट अकाऊंट तयार करुन बदनामी करणा-या व्यक्तीविरुध्द बुधवारी जिल्हा पेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भाजपाचे माजी महानगराध्यक्ष तथा नाथ फाऊंडेशनचे अध्यक्ष अशोक सिताराम लाडवंजारी यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, २ एप्रिल रोजी सकाळी ९ ते १० या वेळेत कोणीतरी अज्ञात व्यक्तीने राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाचे नेते तथा विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या नावाने बनावट फेसबुक पेज तयार करुन त्या पेजवर मुंडे यांचा फोटो अपलोड केला व आमदार एकनाथराव खडसे यांच्या बद्दल जाणूनबुजून बदनामी करण्याच्या उद्देशाने राष्ट्रवादी प्रवेशाची पोस्ट प्रसिध्द केली. तसेच वैभव भरत पाटील या नावाच्या व्टीटर अकाऊंटवरुनही ही वादग्रस्त पोस्ट प्रसिध्द झाली आहे. भादवि कलम ५०० तसेच आयटी अॅक्ट ६६ सी,डी प्रमाणे अज्ञात व्यक्तीविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
काय आहे वादग्रस्त पोस्ट
‘नाथा’ ची राष्ट्रवादीला साथ...एकनाथ खडसे यांचा भाजपाला रामराम,२१ आमदारांसह होणार राष्ट्रवादीत दाखल...मुहूर्त ठरला..एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात होणार जाहीर प्रवेश...!