जळगावात मंडपचे गोदाम आगीत भस्मसात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2018 12:27 PM2018-10-11T12:27:45+5:302018-10-11T12:28:33+5:30

योगेश्वर नगरातील घटना

Fire brigade godown godown fire | जळगावात मंडपचे गोदाम आगीत भस्मसात

जळगावात मंडपचे गोदाम आगीत भस्मसात

googlenewsNext
ठळक मुद्दे४५ लाखांचे नुकसानदोन तास अग्नितांडव

जळगाव : जुने जळगावातील तळेले कॉलनीला लागून असलेल्या योगेश्वर नगरात बुधवारी दुपारी दोन वाजता रवींद्र मंडप डेकोरेटर्स या गोदामाला अचानक आग लागली. त्यात मंडपचे संपूर्ण साहित्य खाक झाले असून त्याची किंमत ४५ लाखाच्या आसपास असल्याचे सांगण्यात येत आहे.
जुन्या जळगावात रवींद्र सुकलाल बारी (रा.निसर्ग कॉलनी, पिंप्राळा) यांच्या मालकीचे रवींद्र मंडम डेकोरेटर्स गोदाम आहे. बुधवारी या गोदामाला कुलुप होते. दोन वाजता अचानक गोदामातून आगीचे लोळ व धूर येताना दिसल्याने नागरिकांची धावपळ उडाली. मिळेत तेथून पाणी आणून नागरिकांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला. शेजारीच रहिवाशी वस्ती असल्याने महिला व लहान मुलांची पळापळ झाली.
महागडे साहित्य खाक
या आगीत मंडप, कनाती, सोफा सेट, चादर, प्लास्टीकच्या खुर्च्या, साज, नवरदेव-नवरीच्या खूर्च्या यासह मंडपाचे डेकोरेशन जळून खाक झाले. मंडप वाहतुकीसाठी असलेली मालवाहू रिक्षाही जळून खाक झाली. तिचा फक्त सांगाडा शिल्लक आहे. पत्र्याचे शेड कोसळले असून पत्रेही निकामी झालेले आहे.
वायर तुटल्याने लागली आग
घटनास्थळावरुन लोकांनी दिलेल्या माहितीनुसार या गोदामाच्यावरुन दुसरीकडे केबल गेलेली आहे. ही वायर तुटून पत्र्याच्या शेडवर पडली. त्यात वीज प्रवाह असल्याने आग लागल्याची माहिती मिळाली.तर मालक रवींद्र बारी यांनी ही आग संशयास्पद असल्याचे म्हटले आहे. तेथे वीजपुरवठाच नाही, त्यामुळे शॉर्ट सर्कीटचा प्रश्नच नाही.
दोन तास चालली आग
नागरिकांनी साठवलेले पाणी तसेच टॅँकर आणून आग विझविण्याचा प्रयत्न केला. महापालिकेचा अग्निशमन बंब अर्धा तास उशिराने आला, तोपर्यंत आगीने उग्र रुप धारण केले होते. क्षणातच हा बंब रिकामा झाला, त्यानंतर दुसरा बंब यायलाही अर्धा तास लागला. एकाच वेळी दोन ते तीन बंब आले असते तर तत्काळ आगीवर नियंत्रण मिळविणे शक्य झाले असते, मात्र बंबाना खूप उशिर झाला.
शेजारची घरे जळाली
या गोदामाच्या शेजारी पार्टीशन व पत्र्याची दोन घरे होती. ती घरे देखील या आगीत खाक झाली आहेत. सुदैवाने या घरांमध्ये कोणी रहात नव्हते. पूर्वी वाचमन या घरात रहात होता अशी माहिती स्थानिक लोकांनी दिली. शेजारी एका बाजुने सिमेंटचे घर असल्याने त्या घराच्या इमारतीवर चढून आग विझविण्यात आली. दोन वाजता लागलेली आग चार वाजता विझली. लोकांनी जीव धोक्यात घालून आग विझविण्यासाठी प्रयत्न केले. वीज पुरवठा खंडीत असल्याने बोरींग सुरु होऊ शकल्या नाहीत. दरम्यान, आगीची माहिती मिळाल्यानंतर आमदार सुरेश भोळे यांनी घटनास्थळी धाव घेतली.
दीक्षितवाडीतही घराला आग
दीक्षितवाडीत रिचा नीलेश सोनार यांच्या घराला दुपारी दोन वाजता आग लागली. या आगीत टीव्ही, फ्रिज, एसी, घरगुती साहित्य, कपडे, पंखे आदी जळून खाक झाले.
कैलास मणियार व त्यांच्या भावाची दोन मजली इमारत आहे. वरच्या मजल्यावर कैलास मणियार राहतात तर तळमजल्यावर रिचा व निलेश सोनार हे पती-पत्नी मुलासह भाड्याने राहतात. या घराला अचानक मागील बाजुने आग लागली. या आगीमुळे रहिवाशांनी तातडीने दोन्ही घरातील चार गॅस सिलिंडर बाहेर काढले तर मणियार हे वृध्द असल्याने त्यांना सुरक्षितरित्या बाहेर हलविले. यावेळी मणियार यांच्या पायाला फ्रॅक्चर झाले आहे. नागरिकांनी घरातील पाणी आणून आग विझविली. अग्निशमन दलाचा बंब आला होता, मात्र तोपर्यंत आग विझविण्यात आली होती. अरुंद गल्ली असल्याने अग्निशमन दलाचा बंब पोहचण्यात अनेक अडचणी आल्या.
आगीचे कारण समजू शकले नसले तरी ही आग लावण्यात आल्याचा आरोप रिचा लोहार यांनी केला आहे.अग्निशमन दलाचा बंब व रहिवाशांनी ही आग विझविली.

Web Title: Fire brigade godown godown fire

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.