मोहिदेपुर येथे आग लागून सहा घरे भस्मसात
By ऑनलाइन लोकमत | Published: April 4, 2019 04:11 PM2019-04-04T16:11:12+5:302019-04-04T16:11:26+5:30
गावात पाणी टंचाईचे दिवस अशातच आग लागल्याने गावकऱ्यांची एकच तारांबळ उडाली.
जामोद: तालुक्यातील नाथजोगी समाजाची वस्ती असलेल्या महिदपुर येथे 4 एप्रिल रोजी दुपारी एक वाजताच्या दरम्यान भर उन्हात आग लागली. आगीमध्ये सलग असलेली सहा घरे जळून भस्मसात झाली. या कुटुंबीयांची अन्न-वस्त्र-निवारा जळून खाक झाला. सुदैवाने कुठलीही जीवित हानी झाली नाही.
भर दुपारी अचानक आग लागल्याचे कळताच मोहिते पुरात खळबळ उडाली आगीमध्ये वर्षभराचे धान्य कपडे, चांदीचे दागिने, घरगुती सामान, खाली सिलेंडर, शेगड्या इंधन अंथरूण-पांघरूण यासह दोन मोटर सायकली जळून खाक झाले.
प्रभाकर विष्णू सोळंके, नाजूक आप्पा शिंदे, तेजराव आप्पा शिंदे, दारा रामा सोळंके, आप्पा खकाना शिंदे आणि सुरेश दारा सोळंके या सहा जणांची सलग घरे होती. ही घरे टीन पत्र्याची व कुळाची होती. आगीमध्ये सहाही कुटुंब उध्वस्त झाले असून ही कुटुंबे रस्त्यावर आली आहेत.
गावकऱ्यांनी विझविली आग
गावात पाणी टंचाई चे दिवस अशातच आग लागल्याने गावकऱ्यांची एकच तारांबळ उडाली. मात्र सर्वांनी संकटात सापडलेल्या कुटुंबीयांसाठी धाव घेतली आपापल्या घरातील पाण्याने भरलेले हंडे आणून सर्व पिण्याच्या पाणी वापरून ही आग विझविण्याचा आटोकाट प्रयत्न केला. त्यांच्या सुदैवाने आज कृषी फिडरला विद्युत पुरवठा सुरू असल्याने बाजूच्या शेतातील विहिरीवरून मोटर चालू करून त्यांनी पाणी आणले व आग आटोक्यात आणली. उशीराने मुक्ताईनगर येथील फायर ब्रिगेडची गाडी व रुग्णवाहिका दाखल झाली. अग्निशमन दलाने राहिलेली आग त्यांनी विझविली. आग कशामुळे लागली याचे कारण मात्र समजू शकले नाही. जळगाव जामोद तालुक्यातील एकाही यंत्रणेने कुठलीही मदत पुरवली नाही.